swt316.jpg
81198
चौकुळः शाळा क्र. ४ च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली.
चिमुरड्यांनी दिली स्वच्छतेची शिकवण
चौकुळमध्ये मोहिमेस प्रतिसादः शाळा क्रमांक ४ चा विधायक उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. ३१ : आंबोलीपासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर वसलेले चौकुळ हे गाव आपल्या निसर्गरम्य सौंदर्याने वर्षानुवर्षे पर्यटकांचे आकर्षण ठरत आले आहे. पावसाळ्यात येथील निसर्ग अधिक खुलतो. झाडांची हिरवळ, धबधबे, वाऱ्याची गार झुळूक आणि दाट धुके अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक इथे गर्दी करतात; मात्र या सौंदर्याला बेफिकीर पर्यटकांनी फेकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, चिप्सची रिकामी पाकिटे, थर्माकोलचे तुकडे आणि कचरा यामुळे काहीशी काळी किनार लागते. चौकुळचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ क्र. ४ च्या चिमुरड्यांनी पुढाकार घेत भर पावसात स्वच्छता मोहीम राबवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
चौकुळ क्र. ४ शाळेचे शिक्षक जावेद तांबोळी यांनी ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत विद्यार्थ्यांकडून ‘स्वच्छतेची चळवळ’ हा अनोखा उपक्रम घेतला. विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या बाटल्या, चिप्सची पाकिटे, थर्माकोलचे तुकडे आणि इतर कचरा गोळा करून निसर्गाची स्वच्छता केली. ‘हे आमचं घर आहे. आम्ही इथे शिकतो, वाढतो, तुम्ही यायला हवंच; पण कृपया निसर्ग खराब करून जाऊ नका, असे आवाहनही विद्यार्थ्यांनी पर्यटकांना केले. या लहान मुलांनी फक्त प्लास्टिकच उचलले नाही, तर मोठ्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली.
चौकुळ हे गाव केवळ पर्यटन स्थळ नाही, तर अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे पर्यटकांनी एक छोटे पाऊल उचलून निसर्ग स्वच्छ ठेवला, तर या मुलांचे भविष्य अधिक हिरवेगार होईल, हाच या उपक्रमामागचा खरा संदेश आहे. या लहानग्यांच्या भावनिक आवाहनातून पर्यटक निश्चितच धडा घेतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ स्वच्छतेचा संदेश दिला नाही, तर त्यांनी स्वतः कृती करून दाखविली. चौकुळ शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सामाजिक जबाबदारीची शिकवण देण्यात आली.
याबाबत शिक्षक तांबोळी म्हणाले की, चौकुळ हे निसर्गरम्य गाव फक्त पर्यटनासाठी नाही, तर येथील विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. ही मुले इथल्या झाडांखाली खेळतात, याच हिरवाईत त्यांचे बालपण घडते. शिक्षण म्हणजे फक्त वर्गात शिकवणे नाही, तर समाजासाठी संवेदनशील नागरिक घडवणे होय आणि हीच शिकवण या चिमुरड्यांनी आज सर्वांना दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.