मंथन शिष्यवृत्तीत
अजिंक्य बुट्टेचे यश
रत्नागिरी : तालुक्यातील कारवांचीवाडी-आदर्श वसाहत शाळेतील दुसरीतील अजिंक्य बुट्टे याने मंथन शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर दहावा क्रमांक आणि जिल्हास्तरावर पाचवा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अजिंक्यला रेणुका उपाध्याय यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका स्मिता सावंत यांनीही प्रोत्साहन दिले. अजिंक्यच्या या घवघवीत यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून, संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. मंथन शिष्यवृत्ती परीक्षा ही राज्यभरातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत स्पर्धात्मक व प्रतिष्ठेची परीक्षा मानली जाते. शाळा प्रशासन, शिक्षक व पालकांनी अजिंक्यचे यश अत्यंत आनंदाने साजरे केले.
देशभक्तिपर
गीतगायन स्पर्धा
रत्नागिरी ः भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या तरुणांनी बलिदान दिले आणि हे वैभवशाली स्वातंत्र्य आम्हाला मिळवून दिले याचे भान प्रत्येक पिढीला आणि आजच्या शालेय विद्यार्थ्याला असणे गरजेचे आहे, या निमित्ताने नवनिर्माण हाय शाळेने क्रांतिदिनाचे औचित्य साधून मंगळवारी (ता. १२) दुपारी १२ ते ५ या वेळेत देशभक्तिपर गीतगायन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन विभागात विभागली गेली आहे. प्राथमिक गट पहिली ते पाचवी आणि माध्यमिक गट सहावी ते नववी. प्रवेशनोंदणी ८ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात करावी. स्पर्धेसाठी लागणारे प्रवेशअर्ज आणि प्रवेशशुल्क शाळेच्या कार्यालयीन वेळेत सकाळी दहा ते पाच करावी. विजयी स्पर्धकांना रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे.
फाटक हायस्कूलमध्ये
खो-खो प्रशिक्षण शिबिर
रत्नागिरी : फाटक हायस्कूलमध्ये जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने खो-खो प्रशिक्षण शिबिर झाले. शिबिराला रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयातील खो-खो प्रशिक्षक आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या ऐश्वर्या सावंत, फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक राजन कीर, क्रीडाशिक्षक मंदार सावंत, बेबी पाटील उपस्थित होते. सावंत यांनी जिल्हा क्रीडा कार्यालयातील खो-खो प्रशिक्षकाचा पदभार स्वीकारल्यानंतर रत्नागिरीतून चांगले खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी विविध शाळांमध्ये खो-खो प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जात आहे. फाटक हायस्कूलमधील विद्यार्थ्यांमध्ये खो-खोची आवड निर्माण व्हावी, चांगले खेळाडू घडावेत यासाठी खेळाडूंना खो-खोची परिपूर्ण माहिती प्रात्यक्षिकांसह दिली. शिबिरामध्ये शाळेतील ५० खेळाडू सहभागी झाले. मुख्याध्यापक कीर यांनी सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
जांभेकर विद्यालयाला
ज्यूदो सुवर्णपदक
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ज्यूदो असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेत सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाने सुवर्णपदक पटकावले. प्रशालेचे विद्यार्थी लावण्या इंदुलकर व विघ्नेश कांदर यांनी सुवर्णपदक पटकावून यश संपादन केले. गुहागर येथे स्पर्धा झाली. यात १४ वर्षाखालील मुली या गटात लावण्या तसेच १४ वर्षाखालील मुले या गटात विघ्नेश याने यश मिळवले. आता त्यांची निवड २२ ते २४ ऑगस्टदरम्यान लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. दोघांचेही व मार्गदर्शन करणारे प्रशालेचे क्रीडाशिक्षक महेंद्र पवार यांचे अभिनंदन मुख्याध्यापिका संजना तारी यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.