महामार्गाची पाहणी की निव्वळ औपचारिकता?
पंधरवड्यात चित्र होणार स्पष्ट ; गणेशोत्सोवापूर्वी रखडलेल्या कामाबद्दल मंत्र्यांच्या बैठका
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाची महिन्याभरात दोन मंत्र्यांनी पाहणी केली. त्यात सार्वजनिक बांधकाममंत्री सहा महिन्यात दोनवेळा आले. त्यांनी प्रत्यक्ष केलेली पाहणी आणि घेतलेल्या बैठकांचे स्वरूप लक्षात घेता हा दौरा आढावा होता की निव्वळ औपचारिकता? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा दौरा गणेशोत्सवात येऊ घातलेल्या चाकरमान्यांसाठी फलदायी ठरणार का, हे पुढील पंधरवड्यात दिसून येईल.
गणेशोत्सवाच्या तोंडावर महामार्गाची पाहणी करून चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी दौऱ्यांचे आयोजन करून वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जातो. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या धोकादायक आणि खड्डेमय प्रवासाचा विषय वर्षभर गाजत असतो. विरोधी पक्ष, चाकरमानी आणि स्थानिक नागरिकांकडून सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले जातात; मात्र गणेशोत्सव जवळ आल्यानंतर महामार्गाची थातूरमातूर दुरुस्ती केली जाते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री या महामार्गाची पाहणी करून हा रस्ता खड्डेमुक्त झाल्याचे जाहीर करतात. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण यांनी गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी कोकण दौऱ्यावर येऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार राज्यात अस्तित्वात आल्यानंतर सार्वजनिक बांधकामखाते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मिळाले. त्यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये या महामार्गाचा दौरा केला होता; मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा धोकादायक प्रवासाचा विषय उपस्थित झाला. त्यामुळे भोसले पुन्हा या रस्त्याच्या पाहणीसाठी आले. अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकीत अधिकाऱ्यांनी आकडेवारीही सादर केली. त्यावर, मंत्र्यांनी गणेशोत्सवासाठी येणाऱ्या कोकणवासियांना सुविधा केंद्र उपलब्ध करून द्या, रस्त्यांची दुरुस्ती, पर्यायी रस्ते, सेवारस्ते, फलक, पेवरब्लॉक यांची कामे तातडीने करा आणि कामांना गती द्या, अशा सूचना दिल्या. खचलेले रस्ते, तुटलेल्या संरक्षण भिंती, खड्डे आणि अंतरातून होणारा प्रवास, वारंवार होणारे अपघात यावर तोडगा काढला गेला तर या बैठका यशस्वी झाल्या, असं म्हणता येईल. मंत्री आले की, यंत्रणा तत्पर होते. मंत्री गेले की, पुन्हा जैसे थे. त्यामुळे मंत्र्यांच्या दौऱ्याची केवळ औपचारिकताच होते.
सार्वजनिक बांधकाममंत्र्यांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनीही महामार्गावरील प्रश्नांबाबत सूचना दिल्या होत्या. त्यावर कार्यवाही करण्यासाठी संबंधित ठेकेदारांनी किती तत्परता दाखवली, हे दिसून आले आहे. त्यामुळे बांधकाममंत्र्यांच्या दौराचे फलीत म्हणून गणेशोत्सवात तरी चाकरमान्यांचा दौरा सुखकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोट १
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी मंत्र्यांना चुकीची माहिती देतात. त्यामुळे ठेकेदाराला पाठबळ मिळते. सार्वजनिक बांधकाममंत्र्यांसमोर राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना खडसावले. महामार्गाच्या एकूण कामाची सविस्तर माहिती दिली. मंत्री त्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे.
- उमेश सकपाळ, शहरप्रमुख शिवसेना
कोट २
चिपळूण येथे उड्डाणपुलाचे काम करताना ठेकेदाराने अपघात होऊ नयेत याची काळजी घेणे गरजेचे होते. उड्डाणपुलाच्या गर्डरला तडे जाणे त्यानंतर तोच गर्डर कोसळणे, पिलरवरून कामगार खाली पडून जखमी होणे असे अनेक अपघात झालेले असताना काही दिवसांपूर्वी लोखंडी सळी पडून विद्यार्थी जखमी झाला म्हणजेच ठेकेदार एजन्सी किती निष्काळजीपणे काम करत आहे हे दिसून येते, याची तक्रार मंत्र्यांकडे केली आहे.
- निहार कोवळे, शहरप्रमुख शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.