83627
संस्कृतचे ज्ञानभांडार प्रत्येकाने जपावे
नितीन बगाटेः आरसीसीच्या संस्कृत बोधवाक्याचे अनावरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : संस्कृत ही भाषांची जननी आहे. संस्कृत भाषेत खूप गोडवा आहे, पावित्र्य व भरपूर ज्ञानभांडार आहे, त्यातील ठेवा जपला पाहिजे, प्रत्येकाने ते आत्मसात करण्याची आज वेळ आली आहे. यासोबतच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने (आरसीसी) सायकल चालवून स्वास्थ्य जपून सुदृढ आरोग्य प्राप्त करत आहे. त्यामुळे बोधवाक्याप्रमाणे संस्कृत जपा व नित्य निरंतर सायकल चालवून गतिशील राहा, असा संदेश जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिला.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या ‘नित्यनिरंतरगतिशीला:’ या बोधवाक्याचे अनावरण शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरात केल्यानंतर ते बोलत होते. रत्नागिरीत प्रथमच संस्कृत दिनानिमित्त संस्कृत भारतीतर्फे संस्कृत सप्ताह साजरा होत असून, या अंतर्गत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या बोधवाक्याचे अनावरण शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरात करण्यात आले. या वेळी संस्कृत भारतीच्या प्रांताध्यक्ष डॉ. कल्पना आठल्ये, दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख अक्षया भागवत, कोकण प्रांत प्रशिक्षणप्रमुख अॅड. आशिष आठवले व क्लबचे प्रतिनिधी राकेश होरंबे मंचावर उपस्थित होते.
गेल्या साडेतीन वर्षांत २५हून अधिक यशस्वी उपक्रमांमधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने सिद्ध केले आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब ही रत्नागिरीची खरी ओळख आहे. आता याच सामाजिक व सांस्कृतिक ओळखीला नित्यनिरंतरगतिशीला: या बोधवाक्याची जोड मिळाली आहे. प्रगतिपथान्नहि विचलेम परम्परां संरक्षेम। समुत्साहिनो निरूद्वेगिनो नित्यनिरन्तरगतिशीला:।। या संस्कृत भारतीच्या गीतामधून बोधवाक्य घेण्यात आले आहे.
संस्कृतचा प्रचार, प्रसार होण्यासाठी संस्कृत भारती व दररोज सायकल चालवणाऱ्यांची संख्या वाढण्याकरिता रत्नागिरी सायकलिस्ट क्लब कार्यरत आहे. त्यामुळेच या दोन्हीसाठी योगदान देणाऱ्या प्रसाद देवस्थळी यांनी बोधवाक्याची संकल्पना मांडली. त्याला संस्कृत भारतीने पाठबळ दिले. या प्रसंगी देवस्थळी यांचा सत्कार पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
चौकट १
पहिलाच क्लब
इंग्रजी बोधवाक्य असलेले अनेक सायकल क्लब आहेत; पण सध्यातरी संस्कृत बोधवाक्य असणारा रत्नागिरी सायकलिस्ट क्लब हा बहुदा पहिलाच क्लब आहे. भारतीय नौदल, हवाईदल, भारतीय विमा महामंडळ, आयआयटी, पोलिसदलसारख्या संस्थांप्रमाणे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनेही संस्कृतमधील बोधवाक्य अंगीकृत केले आहे. या वेळी क्लबच्या नवीन जर्सीचे अनावरण करण्यात आले. त्यावरही नवे बोधवाक्य झळकले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.