83695
जिल्ह्यात हजार मिलिमीटर कमी पर्जन्यमान
भातशेतीवर परिणामाची शक्यता; कीडरोगांची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार मिलिमीटर कमी पाऊस झाला असून, त्याचे परिणाम उशिराने भात लागवड झालेल्या क्षेत्रावर होणार आहेत. त्यातील भातरोपांचे फुटवे कमी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच ऑगस्टमध्ये अनियमित पाऊस पडत असल्याने कातळावरील भातखाचरात पाणी कमी पडणार आहे.
रविवारी (ता. १०) पाऊस झाल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला असला तरीही सोमवारी पुन्हा कडकडीत ऊन पडलेले होते. अनियमित पावसाने शेतकरी चिंतेत पडले आहेत. जिल्ह्यात सरासरी ३,३६४ मिमी पाऊस दरवर्षी पडतो. यंदा १ जून ते ११ ऑगस्ट या कालावधीत सरासरी २,१८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ३,१४१ मिमी पाऊस झाला होता. तुलनेत १ हजार मिमी कमी पाऊस झाला आहे. सर्वांत कमी पावसाची नोंद रत्नागिरी तालुक्यात १,६९९ मिमी आणि गुहागरमध्ये १,६२२ मिमी झाली आहे. सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात २,५६० मिमी झाला. जिल्ह्यात मे महिन्यात जोरदार पाऊस झाला. जून महिन्यात पावसाचा जोर अनियमित होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे भातपेरणी व लावणीचे वेळापत्रक कोलमडले. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांनी चिखलातच पेरणी उरकली. काही ठिकाणी रोपांची योग्य उगवण आणि वाढ झालेली नाही. त्याचा परिणाम रोपांवर झाला आहे.
यंदा ४४ हजार हेक्टरवर भात लागवड झाली आहे. लागवड केलेल्या रोपांची वाढ व्यवस्थित होईल की, नाही अशी स्थिती सर्वत्र दिसत होती. जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पाऊस अनियमित होता. दिवसातून एखादी सर पडून जात होती. दुपारी कडकडीत ऊन पडत होते. हे वातावरण भातरोपांना त्रासदायक ठरत होते. चिपळूणसह संगमेश्वर, रत्नागिरीत कातळ परिसरात भाताच्या रोपांची वाढ अर्धवट राहिलेली होती. काही ठिकाणी भातपिकेही कोमेजली. भातशेतीसाठी जुलै महिन्यात नियमित पाऊस आवश्यक असतो. त्यात अडथळा आल्याने चिंता निर्माण झाली होती. ऑगस्टच्या पहिल्या तारखेपासून पावसाने जोर धरला होता. त्यामुळे भातशेती, भाजीपाला व फळझाडांना आवश्यक पाणी मिळू लागले आहे; मात्र पावसाचा जोर कायम राहणे आवश्यक आहे. सध्या दिवसा कडकडीत ऊन आणि रात्री पाऊस, अशी स्थिती सर्वत्र आहे. सध्या पडलेल्या सरींमुळे जमिनीतील ओलावा टिकून आहे. परिणामी, पिकांची वाढ सुरळीत होईल अशी शक्यता आहे.
कोट १
सध्या सरीवरचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे भातशेतीला पूरक वातावरण आहे; परंतु पावसाने पुढे विश्रांती घेतली तर पाने गुंडाळणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी कृषी विभागाकडून अनुदानावर कीटकनाशके देण्याची तयारी केली आहे.
- विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी.
---
कोट २
ज्या क्षेत्रात भात लावण्या वेळेत झाल्या आहेत त्या शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमिततेचा फटका बसलेला नाही; मात्र १० जुलैनंतर झालेल्या लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
- संतोष भडवळकर, शेतकरी.
-------
चौकट
जिल्ह्यात पडलेला तालुकानिहाय पाऊस असा-
तालुका ११ ऑगस्ट २०२५ (मिमी) ११ ऑगस्ट २०२४ (मिमी)
-------------------------------------
* मंडणगड २१७३ ३४७३
* दापोली २०५४ ३२६३
* खेड २५६० ३३४३
* गुहागर १६२९ २५८५
* चिपळूण २५०० ३२८९
* संगमेश्वर २३०० ३५३९
* रत्नागिरी १६९९ ३१४५
* लांजा २३३२ ३२९०.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.