84191
आंदोलनेही निरर्थक ठरतात तेव्हा...
रवी जाधवांची हतबलता; सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील दैना
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी जाधव यांनी यापुढे रुग्णालयाच्या सुधारणेसाठी कोणतेही आंदोलन किंवा उपोषण करणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे. शिवाय रुग्णकल्याण समिती सदस्यपदाचा राजीनामाही देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रुग्णांच्या मृत्यूच्या वाढत्या घटना पाहून, आता कोणालाही दोष देणे किंवा आंदोलन करणे निरर्थक ठरत असल्याची हतबलता त्यांनी व्यक्त केली.
जाधव यांनी या संदर्भात प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, गेल्या काही दिवसांत रुग्णालयात अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. अपघातात जखमी झालेल्या एका तरुणाला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याला नातेवाईकांच्या डोळ्यांसमोर प्राण गमवावे लागले. निपाणी येथील २३ वर्षांच्या तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्यावर तो स्वतः चालत रुग्णालयात आला होता; मात्र त्यावेळी फिजिशियन उपलब्ध नसल्यामुळे त्यालाही जीव गमवावा लागला. अशा अनेक घटना या रुग्णालयात घडत आहेत. ‘ज्याचा होता तो गेला, कोणाला काहीच फरक पडला नाही आणि यापुढेही पडणार नाही.’ येथील नागरिक सर्वकाही सहन करत आहेत. त्यामुळे आंदोलन किंवा उपोषण कोणासाठी करायचे, असा प्रश्न पडला आहे.
यामुळेच आता कोणत्याही डॉक्टरला, शासनाला किंवा राजकीय मंडळींना दोष न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मते, आज शहरात प्रत्येकजण आपले नाव मोठे करण्यात व्यस्त आहे, पण सावंतवाडीच्या आरोग्य समस्यांबाबत एकही राजकीय पुढारी गंभीर नाही, हे येथील नागरिकांचे दुर्दैव आहे. गेल्या सहा वर्षांपासून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान रुग्णालयात २४ तास रुग्णांना सेवा देत आहे. रुग्णांना उपचार मिळत नसल्यामुळे जीव गमवावा लागताना पाहणे खूप वेदनादायी आहे. आम्ही फक्त रुग्णांना सेवा देऊ शकतो, पण त्यांचा जीव वाचवू शकत नाही, ते काम डॉक्टरांचे आहे; पण डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण वाटेत किंवा गोव्याला जाताना रस्त्यातच प्राण गमावत आहेत.
-----
राजीनामा देण्याचा निर्णय
या सर्व परिस्थितीमुळे जाधव यांनी रुग्ण कल्याण नियामक समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ज्या ठिकाणी रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही आणि त्यांना जीव गमवावा लागतो, तिथे आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही,’ अशी त्यांची भावना आहे. अशा समितीवर राहण्याचा आपल्याला कोणताही हक्क नाही, असे त्यांनी म्हटले आहे. लवकरच ते आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. या परिस्थितीतही सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून रुग्णांना मिळणाऱ्या सेवांमध्ये कोणतीही कमतरता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, आता कोणत्याही प्रकारच्या आंदोलनातून रुग्णालयाच्या अवस्थेवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.