इन्सुलीत ‘मल्टिस्पेशालिटी’ उभारा
‘स्पिनिंग मिल’ समिती ः ‘त्या’ १२६ एकरचा उपयोग करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ ः इन्सुली दशक्रोशीतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी १९७७ मध्ये अवघ्या तीन रुपये गुंठा दराने १२६ एकर जमीन स्पिनिंग मिलसाठी दिली होती. आता या जागेवर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची मागणी शेतकरी करत आहेत. स्पिनिंग मिल संघर्ष समितीचे सचिव सूर्या पालव यांनी प्रशासनाकडे ही मागणी केली असून या जागेत भव्य हॉस्पिटल बांधून जिल्हावासीयांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केली आहे.
गावातील आणि आसपासच्या युवकांना नोकरीसाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागू नये, यासाठी १९७७ मध्ये ही जमीन तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि मंत्री भाईसाहेब सावंत यांच्या उपस्थितीत स्पिनिंग मिलला दिली होती. काही काळ मिल सुरू राहिली. मात्र, काही कारणांमुळे ती बंद पडली. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सुविधांचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या जागेत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारल्यास जिल्हावासीयांची व्यवस्था होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या हॉस्पिटलमध्ये पात्रतेनुसार शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशीही त्यांची मागणी आहे. तसेच या जागेवर रोजगाराभिमुख प्रकल्प आणावा, जेणेकरून परिसरातील तरुणांना रोजगार मिळेल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
..................
भूसंपादनाविरोधात संघर्षाचा इशारा
अलीकडेच काही धनदांडग्यांकडून ही जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप श्री. पालव यांनी केला आहे. जर कोणी ही जमीन खरेदी करण्याचा विचार करत असेल तर त्यांनी तो करू नये. शेतकरी आणि संपूर्ण गाव या विरोधात संघर्ष करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शेतकरी आपल्या जमिनीच्या मोबदल्यात रोजगाराची अपेक्षा करत असून यावर प्रशासनाने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
.....................
पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार
जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. रुग्णांना वारंवार गोवा बांबोळी येथे उपचारासाठी पाठविण्यात येते. या प्रश्नासंदर्भात लवकरच पालकमंत्री नीतेश राणे यांची भेट घेऊन त्यांना हॉस्पिटल किंवा इतर रोजगाराभिमुख प्रकल्प आणण्याची विनंती केली जाणार असल्याचेही पालव यांनी सांगितले. यावेळी सदस्य नलू मोरजकर, आनंद राणे, संजय राणे, सखाराम बागवे, न्हानू कानसे, महादेव राणे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.