८४९१८
८४९६४
इंट्रो
कोकणाला लाभलेल्या अलौकीक निसर्गसौंदर्यामध्ये ७२० किलोमिटीर लांबीच्या निळाशार समुद्र किनारपट्टीने भर घातली आहे. या किनारपट्टीवर पर्यटन, मासेमारी यासह आता कोळंबी संवर्धन प्रकल्पातून लाखो रूपयांची उलाढाल अन् रोजगारनिर्मितीही होत आहे. कमी कालावधीत जादा उत्पन्न मिळवून देणाऱ्या कोळंबी शेतीसमोर विविध समस्या अन् आव्हाने आहेत. कोरोनानंतर हा उद्योग अडचणीत सापडलेला असतानाच अमेरिकेने केलेल्या शुल्कवाढीची भर पडली आहे. असा अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी शासनाकडून पाठबळाची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने कोळंबीशेतीला कृषीचा दर्जा देवून राज्यशासनाने टाकलेले एक पाऊल स्वागतार्ह आहे. या निर्णयाला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा कोळंबी प्रकल्पधारक करीत आहेत.
- राजेंद्र बाईत, राजापूर
...................
कोळंबी संवर्धन प्रकल्पांचे भवितव्य निर्यातीवर
उद्योगात जोखीम अधिक; सरकारचे पाठबळ हवे
कोळंबी प्रकल्पाच्या यशामध्ये प्रकल्पासाठी जागा निवड करणे अत्यंत महत्वाचे ठरते. पाण्याची उपलब्धतता, मातीचा प्रकार, सपाट जमिन, प्रकल्पाला जोड रस्ते, वीज आणि बाजारपेठेपर्यंत जोडले जाणे आदी मुद्दे विचारात घेवून कोळंबी प्रकल्पासाठी जागा निश्चिती केली जाते. या प्रकल्पासाठी उन्हाळी-पावसाळी हंगामात मुबलक पाणी उपलब्ध होईल, हलकी, चांगली निचरा होणारी आणि खारट माती उपलब्ध असेल, सपाट किंवा थोडी उतार असलेली जमीन याला कोळंबी प्रकल्पासाठी प्राधान्य दिले जाते. त्यात समुद्राजवळील किंवा खाडी परिसरातील जागा चांगली असली तरी, जास्त जोराचा वारा किंवा वादळ येणाऱ्या ठिकाणी जागा निवडणे टाळले जाते. परंतु पाणी सतत मिळेल यावल सर्वाधिक भर दिला जातो.
.............
rat१७p११.jpg-
८४९१९
पाण्यातील ऑक्सिजनची पातळी सांभाळणारे एरिएटर.
प्रकल्पाचे नियोजन महत्वाचे
कोळंबी प्रकल्पाच्या यशात खाद्य, विष्ठा काढणे, रोगांचा प्रादुर्भाव रोखणे, योग्य पाण्याचे तापमान राखणे आदींचे योग्य नियोजन करणे महत्वाचे असते. प्रकल्पामध्ये सोडलेल्या पिल्लांना योग्यवेळी खाद्य देण्यासह कोळंबीची विष्ठा (स्लज) साठवण्यासाठी खड्डा तयार करणे, एरिएटरच्या सहाय्याने पाणी हलते ठेवून पाण्यातील ऑक्सिजनची पातळी सांभाळणे, त्याबरोबर मध्यभागी असलेल्या खड्ड्यामध्ये साचलेली कोळंबीची विष्ठा पंपाद्वारे योग्यवेळी बाहेर काढणे याबाबतचे नियोजन करणे महत्वाचे असते. उन्हाळ्यामध्ये खारे पाणी सहज उपलब्ध होते. मात्र, पावसाळ्यामध्ये खार्या पाणी उपलब्धततेचा प्रश्न निर्माण होत असताना त्याचे नियोजन करणे आव्हानात्मक असते. पावसाळ्यामध्ये काहीवेळा अतिवृष्टी होवून प्रकल्पातील पाण्याची पातळी कमालीची वाढते. त्यातून, प्रकल्पातील कोळंबीला धोका निर्माण होतो. या साऱ्या बाबींकडे सतत लक्ष ठेवावे लागते. त्यामध्ये हलगर्जीपणा वा चुका झाल्यास मोठी आर्थिक झळ सहन करावी लागते. कोळंबी शेती प्रकल्पाचे नियोजन करणे आव्हानात्मक ठरते.
-----
कोळंबीला रोग प्रादुर्भावाचे आव्हान
कोळंबी प्रकल्पातील पाण्याच्या योग्यवेळी विविध तपासणी न केल्यास, पाणी शुद्धीकरण न केल्यास त्याच्यातून, रोगाचा प्रादुर्भाव होवून कोळंबी मरण्याची अधिक शक्यता असते. पाण्याचा पीएच सर्वसाधारण चार पीपीएमपेक्षा अधिक असावा लागतो. तो राखण्यासाठी दिवसातून किमान दोनवेळा पाण्याचा पीएच तपासण्यासह सॅलेनिटी (खारटपणा), ऑक्सिजनची पातळी, अमोनिअम नायट्रेट आदींच्याही योग्यवेळी तपासण्या कराव्या लागतात. त्याचवेळी खाडीमधील पाणी तळ्यामध्ये घेतल्यानंतर आवश्यक त्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियाही भर द्यावा लागतो. अन्यथा, कोळंबीतील रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक असते.
------
कोरोनाने व्यवसायिकांचे कंबरडे मोडले
कोरोना महामारीचा अन्य घटकांप्रमाणे कोळंबी संवर्धक प्रकल्पधारकांनाही आर्थिक फटका बसला. वाहतूक ठप्प झाल्याने कोळंबीला आवश्यक असलेले खाद्य उपलब्ध होत नव्हते. प्रकल्पामध्ये विक्रीयोग्य कोळंबी तयार झाली. मात्र, प्रकल्पापासून बाजारपेठेमध्ये नेण्यासाठी आवश्यक असलेली वाहतूक परवानगी मिळत नव्हती. कामगारही उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे तयार कोळंबीची योग्यवेळी विक्री न झाल्याने त्यातून झालेल्या आर्थिक नुकसानीने कोळंबी प्रकल्प व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांनी कोळंबी प्रकल्पच बंद करण्याचा निर्णय घेतला. तर, दुसऱ्या बाजूला कोरोनानंतरच्या कालावधीत चीनमध्ये कोळंबीची होणारी निर्यात कमी झाली. त्यामुळे कोरोनापूर्वीचे आणि नंतरचे मिळणारे कोळंबी संवर्धकाना दर यामध्ये मोठी तफावत जाणवायला लागली आहे.
-----
दरातील चढ-उताराने बिघडते अर्थकारण
रत्नागिरी जिल्ह्याला सागरी किनारपट्टीला विविध प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात मिळते. ही मासळी कोळंबीच्या तुलनेमध्ये कमी दराने खवय्यांसह हॉटेल व्यवसायिकांना उपलब्ध होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर कोळंबीला कमी दराच्या माशांची स्पर्धा असते. मुबलक प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या मासळीच्या दराने कोळंबीची विक्री करणे कोळंबी प्रकल्पधारकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्यांना परदेशात होणाऱ्या निर्यातीवर अवलंबून रहावे लागते. मात्र, सातत्याने आंतरराष्ट्रीय घडामोडी, युद्धजन्य स्थिती, विविध देशांकडून निर्यातीवर लादलेले जाणारे कमी-जास्त प्रमाणातील निर्बंध याच्यातून कोळंबीच्या दरामध्ये सातत्याने चढ-उतार राहतात. यामुळे आर्थिक फटका बसतो. कोळंबी निर्यात करणारे मोठे निर्यातदार छोट्या प्रकल्पधारकांकडून कोळंबी खरेदी करण्यास फारसे उत्सुक राहत नाही. साहजिकच, त्याचा फटका छोट्या प्रकल्पधारकांना बसत आहे.
------
शीतगृहाचा अभाव
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कोळंबीला चांगला दर मिळत असल्याने ती जास्तीत जास्त परदेशामध्ये निर्यात करण्यावर प्रकल्पधारकांचा भर असतो. परदेशामध्ये होणार्या निर्यातीसोबत स्थानिक पातळीवर मुंबई, गोवा आदी ठिकाणीही मोठ्याप्रमाणात कोळंबीला मागणी आहे. त्याच्यातून, कोळंबीला बाजारपेठ उपलब्ध होत आहे. मात्र, काहीवेळा दरातील तफावत लक्षात घेवून वाढीव दर मिळेपर्यंत कोळंबीची साठवणूक करणे गरजेचे असते. त्यासाठी आवश्यक असलेले शीतगृहाची (कोल्डस्टोरेज) उभारणी करणे खर्चिक बाब असून छोट्या प्रकल्पधारकांना न परवडण्यासारखी असते. त्यामुळे छोट्या प्रकल्पधारकांना शीतगृह असलेल्या निर्यातदार कंपन्यांवर अवलंबून रहावे लागते. मात्र, प्रत्येकवेळी त्यांच्याकडून शीतगृह उपलब्ध होईलच असे नाही. या स्थितीत कोळंबी खराब होवून छोट्या प्रकल्पधारकांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे, कोळंबीची साठवणूक करण्यासाठी सहकारी तत्वावर शीतगृहाची उभारणी होणे गरजेचे आहे.
-----
कोळंबी बीज आणि खाद्य निर्मिती प्रकल्पांचा अभाव
कोळंबी प्रकल्पासाठी कोकणातील पोषक वातावरण असले तरी, कोळंबीचे बीजनिर्मिती आणि खाद्यनिर्मिती करणारे प्रकल्प कोकणातच नव्हे तर, महाराष्ट्रामध्येही नाहीत. त्यामुळे कोळंबीचे बीज आणि खाद्यासाठी कोळंबी प्रकल्पधारकांना परराज्यांतील प्रकल्पांवर अवलंबून रहावे लागते. आधीच बीज आणि खाद्य महाग, त्यामध्ये परराज्यातून या ठिकाणी आणण्यासाठी येणाऱ्या भरमसाठ खर्चाचा पडणारा भार. याच्यातून कोळंबी बीज आणि खाद्यावर होणारा अवाढव्य खर्च प्रकल्पधारकाच्या अवाक्याबाहेर जातो. हा खर्च कमी करण्यासाठी बीज निर्मिती करणाऱ्या हॅचरी आणि खाद्य निर्मिती करणारे प्रकल्प शासनाने स्थानिक पातळीवर वा राज्यामध्ये उभारणी करणे गरजेचे आहे. जेणेकरून, कोळंबी प्रकल्पधारकांना ते सहाय्यभूत ठरतील.
------
खर्च-उत्पन्नाचा समतोल बिघडतो
कोळंबी संवर्धक प्रकल्प उभारणीकरता जागा, निमखारे पाणी उपलब्धता, रस्ता आणि वीज ह्या प्रमुख बाबी आहेत. प्रकल्पासाठी अशी सर्वसोयींनीयुक्त जागा विकत घेणे परवडत नसल्याने प्रकल्पधारकाकडून जागा भाड्याने घेण्याला प्राधान्य दिले जाते. अशा खाजगी जमिनीचे भाडे प्रति हेक्टरी प्रतिवर्षी सुमारे एक लाख रुपये असते. त्यानंतर, बीज, खाद्य आणि विक्री योग्य किंमत मिळणे ह्या मूलभूत बाबी आहेत. कोळंबी प्रकल्पामध्ये सतत प्रवाहीत राहणार्या वीजप्रवाहामुळे महिन्याचे वीजबिल सुमारे एक लाखापेक्षा जास्त येते. कोळंबीचे बीज आणि खाद्य स्थानिक पातळीवर उपलब्ध होत नसल्याने ते परराज्यातून आणावे लागते. त्यामुळे त्याचा खर्चही भरमसाठ येतो. बीज, खाद्य, वीज, मजुरी यांचे दरही दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. एकंदरीत, वाढणाऱ्या खर्चाने प्रकल्पधारकाचे आर्थिक गणित बिघडते.
------
अमेरीकेतील कोळंबी निर्यात घटण्याची शक्यता
गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये भारतातून निर्यात केलेल्या एकूण कोळंबीपैकी सुमारे ६६ टक्के निर्यात अमेरिकेत केली गेल्याची माहिती उपलब्ध आहे. सध्या भारताच्या कोळंबी निर्यातीवर अमेरीकेने विविध प्रकारची सुमारे ५२ टक्के शुल्कवाढ केली आहे. त्याच्यातून, भारतातून अमेरिकेत निर्यात होणारी कोळंबी महाग होणार आहे. तर, दुसऱ्या बाजूला निर्यातीवर होणारी शुल्कवाढ विक्रेता की खरेदीदार यापैकी कोणाकडून वसुली केली जाणार? हे अद्यापही अनिश्चित आहे. या साऱ्यामध्ये भारताकडून अमेरिकेत कोळंबीची होणारी आयात घटण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास अमेरिका तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त असलेल्या देशाकडील कोळंबीची आयातीला प्राधान्य देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचवेळी अमेरिकेकडून केल्या गेलेल्या शुल्कवाढीमुळे शेतकरी ते निर्यातदार ही सध्या कार्यरत असलेली साखळीही आर्थिकदृष्ट्या विस्कळीत होणार आहे.
------
नव्या बाजारपेठेचा शोध घेण्याचे आव्हान
शुल्कवाढीच्या निर्णयामुळे भारतातून होणारी कोळंबी निर्यात घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, भारतातील कोळंबी उत्पादन जैसे थे राहणार आहे. त्यामुळे उत्पादीत कोळंबीची परदेशात निर्यात करण्यासाठी भारतातील कोळंबी उत्पादक वा निर्यातदारांना अमेरिकेला पर्याय म्हणून नव्या बाजारपेठेचा शोध घ्यावा लागणार आहे. पर्यायी बाजारपेठ म्हणून चीन, युरोपीय देशांना प्राधान्य द्यावे लागणार असल्याचे अभ्यासकांकडून सांगितले जात आहे. पण अमेरिकेच्या तुलनेत युरोप व इतर देशांमध्ये कोळंबीची मागणी खूपच अल्प आहे. शिवाय चीन, व्हिएतनाम या देशांच्या कोळंबी मालाच्या किमती या वाजवीपेक्षा कमी असतात, त्या किमती भारतातील निर्यातदारांना परवडणाऱ्या नाहीत. दुसऱ्या बाजूला, परदेशात होणारी निर्यात घटल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी स्थानिक बाजरपेठ शोधण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोळंबीसाठी स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाल्यास शेतकरी, व्यापारी यांना फायदा होईल पण निर्यातदारांच्यादृष्टीने स्थानिक बाजारपेठेची साखळी अडचणीची ठरू शकते, असे मत अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे.
..................
असे आहे कोळंबीतील अर्थकारण
साधारणपणे ६५ ते ६८ दिवसांमध्ये कोळंबी विक्रीसाठी योग्य होते. पण नफा मिळविण्यासाठी त्यांचे संवर्धन १२० ते १८० दिवसांपर्यंत केले जाते. त्याचा सर्वसाधारणतः काउंट ३० ते ७० (एक किलोमध्ये ३० ते ७० कोळंबी) होतो. सुमारे साडेचार हजार चौरस फूट आकाराच्या एका प्रकल्पासाठी एका हंगामात प्रकल्प उभारणी, बीज खरेदी, खाद्य खरेदी, वीजपुरवठा शेड, वीजबिल, कामगार खर्च, डिझेल खरेदी, औषध खरेदी, अत्यावश्यक मशीनरी, साहित्य ठेवणे वा कामगारांना राहण्यासाठी शेड यावर साधारणतः १५ ते १८ लाख खर्च येतो. सुमारे साडेचार चौरस फुट आकाराच्या एका या प्रकल्पामध्ये सरासरी ३.५ ते ५ टन कोळंबी तयार होते. सरासरी प्रति किलो ३५० ते ४५० रुपये दराने विक्री झाल्यास त्यातून, २२ ते २४ लाख रूपये उत्पन्न मिळते.
------
पॉइंटर
कोळंबी सेवनाचे आरोग्यविषयक फायदे
* शरीरातील कर्करोगांच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध
* कोळंबीतून मिळणाऱ्या कॅल्शियममुळे हाडे मजबूत होणे
* कोळंबीतील व्हिटॅमिन ई मुळे त्वचा निरोगी राहते
* जीवनसत्व बी १२ मुळे शरीराच्या नसा आणि रक्तवाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी फायदेशीर
* कोळंबी सेवनाने शारीरीक ऊर्जा वाढण्यास मदत
..............
चौकट
कोळंबी शेतीतील यशाचे घटक
* योग्य मत्स्यबीज निवड
* पाण्यातील ऑक्सिजनचा संतुलित पुरवठा
* मासे वाहून जाणार नाहीत याची योग्य ती खबरदारी
* संरक्षक कुंपण घालून चोरीपासून संरक्षण
* सीसीटीव्हीमुळे लक्ष ठेवणे सोपे
* नियमित पाण्याचे परीक्षण
...................
चौकट १
कोळंबी प्रकल्पासमोरील आव्हाने
* योग्य जागेची निवड
* योग्य व्यवस्थापन
* कामगारांची उपलब्धतता
* महिन्याला लाखो रूपये येणारे वीज बिल
* दरातील चढ-उतार
* खाद्याचे वाढलेले दर
* कोळंबी चोरीचे वाढते प्रमाण
* शीतगृहांचा अभाव
.............
चौकट २
कोळंबी प्रकल्पधारकांच्या मागण्या
* राज्यात कोळंबी बीजनिर्मिती हॅचरी उभारणे गरजेचे
* खाद्यनिर्मिती प्रकल्पांची आवश्यकता
* खारलॅण्डच्या पडीक जमीनींचा उपयोग कोळंबी निर्मितीसाठी शक्य
* वीजबिलाचा दर कमी करणे वा त्यासाठी अनुदान देणे
* स्थानिक पातळीवर शीतगृहांची उभारणी
...................
एक नजर...
* रत्नागिरी जिल्ह्यात नोंदणीकृत कोळंबी प्रकल्प ५०
* कार्यरत प्रकल्प २६
* बंद प्रकल्प २४
-----------
कोट १
अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्कामुळे भारतातील कोळंबीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कारण कोळंबीचे बाजारमूल्य कमी होणार व ते बाजार मूल्य कोळंबी उत्पादक शेतकऱ्याला परवडणारे नसेल. नव्या बाजारपेठेचा शोध घेणे कोळंबी निर्यातदारांसमोर आव्हान राहीले आहे. त्यामधून पर्यायी बाजारपेठ म्हणून चीन, युरोपीय देशांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने चर्चा करून हे आयात शुल्क कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा आहे.
- अभिषेक पवार, निर्यातदार, गोवा
----
कोट २
निमखारे पाण्यातील कोळंबी संवर्धनासाठी प्रामुख्याने टायगर आणि व्हेनामी (व्हाईट) या प्रमुख दोन प्रजातींना प्राधान्य दिले जाते. संपूर्ण कोकणपट्टीचा विचार केल्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील पाण्याचा दर्जा हा दोन्ही जातींच्या कोळंबीचे संवर्धन करण्याकरीता चांगला आहे. कोळंबी संवर्धक प्रकल्प उभारणीकरीता जागा उपलब्ध झाल्यास मत्स्य पदवीधर देखील असे प्रकल्प उभारणी करण्यास उत्सुक राहतील आणि स्वयंरोजगाराच्या दिशेने चांगली वाटचाल होऊ शकते.
- डॉ. मिलिंद सावंत, अभ्यासक, माजी प्राध्यापक मत्स्य महाविद्यालय
..............
कोट ३
गेल्या अनेक वर्षापासून कोळंबी प्रकल्पाला शेतीपूरक व्यवसायाचा दर्जा होता. आता कोळंबी प्रकल्पाला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून झालेला आहे. हा निर्णय निश्चितच स्वार्गतार्ह आहे. त्यामुळे कोळंबी प्रकल्पधारकांना अनेक समस्या सोडवण्यास मदत होईल. या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी झाली पाहिजे.
- भुपेंद्र परब
---
कोट ४
कोळंबी शेतीतून कमी कालावधीमध्ये चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे आर्थिक उत्पन्नाच्यादृष्टीने कोळंबी शेती फायदेशीर आहे. मात्र, त्यासाठी योग्य जागा निश्चितीसह सुयोग्य नियोजन आणि व्यवसायिक दृष्टीकोनाची आवश्यकता आहे.
- संकेत हळदवणेकर, मत्स्य पदवीधर
----
कोट ५
कोळंबीच्या दरातील सातत्याने राहणार्या चढ-उतार आणि कोळंबीची साठवणूक करण्यासाठी शीतगृह नाही. त्याच फटका प्रकल्पधारकांना बसतो. त्यासाठी शीतगृह उभारण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च प्रकल्पधारकाच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे शासनाने सहकाराच्याधर्तीवर कोळंबी शेतीसाठी उपयुक्त शीतगृह उभारणी केल्यास त्याचा प्रकल्पधारकांना निश्चितच फायदा होईल.
- दर्शना भोई, कोळंबी प्रकल्पधारक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.