मनाई आदेश
जिल्ह्यात लागू
रत्नागिरी : कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १९ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केला आहे. जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव हा सण साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.
‘युवा विचार’
भित्तिपत्रकाचे अनावरण
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात ''युवा विचार-एक मुक्त व्यासपीठ'' या भित्तिपत्रकाचे अनावरण संस्थेच्या कार्याध्यक्ष नमिता कीर यांच्या हस्ते झाले. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून नवनवीन विषयावर लिखाण करण्याचे आवाहन केले. युवा विचार-एक मुक्त व्यासपीठ या भित्तिपत्रकाअंतर्गत ‘आत्मनिर्भर भारत-युवापिढीचे योगदान’ व ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी पोस्टर, निबंध, कविता आदी स्वरूपात भित्तिपत्रक भरवण्यात आले होते. कार्यक्रमाला भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह सुनील वणजू, उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, सदस्य विनायक हातखंबकर, चंद्रकांत घवाळी, प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, भित्तिपत्रक विभागप्रमुख प्रा. वीणा कोकजे उपस्थित होते.
संगमेश्वर आयटीआयत
‘सोलर’ अभ्यासक्रम
रत्नागिरी ः संगमेश्वर आयटीआय येथे सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून, संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी उमेदवारांनी अर्ज भरण्याची अंतिम मुदत बुधवारी (ता. २०) सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य र. वि. कोकरे यांनी केले आहे. पारंपरिक ऊर्जास्रोत मर्यादित असल्याने आता अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर, सौरऊर्जेचा वापर वेगाने वाढत आहे. सौरपॅनेल, सौरदिवे, सौरवॉटर हीटर, सौरचूल, सौरकंदील यांसारख्या सौर उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने, औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर येथे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांना हा अभ्यासक्रम निवडण्याची संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी उमेदवारांनी अर्ज भरण्याची अंतिम मुदत उद्यापर्यंत आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.