जोशी ग्रंथालयात
ग्रंथ प्रदर्शन
रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या (कै.) बाबूराव जोशी ग्रंथालयात भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी निगडित ऐतिहासिक ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी त्याचे उद्घाटन केले. ग्रंथप्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्यलढा, क्रांतिकारकांविषयीची माहिती, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारत आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि राजकीय जडणीघडणीविषयी माहिती पुरवणाऱ्या पुस्तकांची रचना करण्यात आली. या प्रसंगी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, समाजशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे, ग्रंथपाल किरण धांडोरे, साहाय्यक ग्रंथपाल उत्पल वाकडे, वाचक गट प्रतिनिधी ओंकार आठवले आदी उपस्थित होते.
रत्नागिरीत उद्या
रक्तदान शिबिर
रत्नागिरी : प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे देशभरात महारक्तदान अभियान राबवण्यात येत आहे. या निमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. या अभियानात रत्नागिरी, खेड आणि दापोली येथे रक्तदान शिबिरे होणार आहेत. रत्नागिरीमध्ये रविवारी (ता. २४) जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत शिबिर भरवण्यात येणार आहे. शिबिराची वेळ सकाळी १०.३० ते दुपारी २ अशी आहे. या महाअभियानाशी जोडण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांनी रक्तदान करावे, असे आवाहन ब्रह्मकुमारींच्या संचालिका शारदा बहनजी यांनी केले आहे.
पोस्टर स्पर्धेला प्रतिसाद
रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात विद्यार्थी पिळवणूक या गंभीर समस्येवर जनजागृती करण्यासाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपणे, हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी कलाकृतींमधून या समस्येचे गांभीर्य समाजासमोर आणले. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने आपले विचार चित्रांच्या आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून मांडले. विद्यार्थ्यांनी ‘बुलिंग’सारख्या प्रकारांवर भाष्य केले. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या समस्यांबद्दल बोलण्यास घाबरू नये. कोणत्याही प्रकारची पिळवणूक होत असल्यास त्यांनी लगेचच शिक्षकांशी किंवा पालकांशी बोलले पाहिजे. महाविद्यालयाचे वातावरण हे आनंदी आणि समस्यांविरहित असले पाहिजे, या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली. डिजिटल पोस्टर आणि हस्तकौशल्याने साकारलेली पोस्टर अशा दोन्ही प्रकारात ही स्पर्धा झाली.
नवीन नंबरप्लेटसाठी
३० नोव्हेंबरपर्यंत मुदत
रत्नागिरी ः १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (HSRP) बसवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिला आहे. सर्व वाहनांना एचएसआरपी बसवण्याची तरतूद केली आहे. ही नंबरप्लेट न बसवणाऱ्या वाहनमालकांचे वाहन हस्तांतरण, कर्जबोजा चढवणे, उतरवणे आदी कामांवर आधीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यापुढे अशा वाहनमालकांच्या वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण आदी सर्व कामे थांबवण्यात येतील. वायूवेग पथकामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना एचएसआरपी लावल्याशिवाय सोडण्यात येणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.