महावितरणची ३५ कोटींची थकबाकी
वसुलीसाठी आक्रमक पावले; एक लाख २२ हजार ग्राहक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : जिल्ह्यात महावितरणच्या वीजग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याचे पुढे आले आहे. सर्वच ग्राहकांचा यामध्ये समावेश आहे. एकूण १ लाख २२ हजार ७७ ग्राहकांकडील ३५ कोटी २९ लाखांची वीजबिलं थकीत आहेत. यामध्ये शासकीय बिलांचाही समावेश आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान महावितरणसमोर आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी रत्नागिरी विभागात आहे. या विभागात ५६ हजार ५४८ ग्राहकांकडे १६ कोटी ४८ लाखांची थकबाकी आहे. त्या खालोखाल खेड विभागात ३४ हजार ८६१ ग्राहकांकडे १०.५८ कोटी आणि चिपळूण विभागात ३० हजार ६६८ ग्राहकांकडे ८.२३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. तालुकानिहाय आकडेवारी पाहिल्यास, रत्नागिरी (शहरी) विभागात सर्वाधिक १० हजार ८३१ ग्राहकांकडे ५.७० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यानंतर चिपळूण (ग्रामीण) विभागात ९ हजार ८० ग्राहकांकडे २ कोटी ४७ कोटी आणि रत्नागिरी (ग्रामीण) मध्ये ८ हजार ८९१ ग्राहकांकडे ३ कोटी १९ लाखांची थकबाकी आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, शहरी व ग्रामीण दोन्ही भागांतील ग्राहकांकडे मोठी थकबाकी आहे.
जिल्ह्यात १ लाख ३ हजार ६८२ घरगुती ग्राहकांकडे १३ कोटी ८३ लाख, ११ हजार ३७ व्यावसायिक ग्राहकांकडे ४ कोटी ९६ लाख तर ९२२ औद्योगिक ग्राहकांकडे १.६७ लाखांची थकबाकी आहे. पथदीपांचे ९ कोटी ५६ लाख, जलव्यवस्थापनाचे ४ कोटी २४ लाख यांसह शासकीय कार्यालयांचे ९४ लाख थकीत आहेत. या आकडेवारीमुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होत असून, भविष्यात वीजपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थकबाकी वाढल्याने महावितरण आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.
---
कठोर पावले उचलणार...
ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. वीजपुरवठा खंडित करणे, थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करणे असे उपाय योजले जाऊ शकतात. वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.