जिल्ह्यात २५ हजार नव्या वाहनांची भर
एकूण संख्या पाच लाखांवर; ११८ पेट्रोलपंप भागवताहेत इंधनाची तहान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : जिल्ह्यात विविध प्रकाराची पाच लाख वाहने धावत असल्याची नोंद येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. यंदा त्यात २५ हजारांची भर पडली. जिल्ह्यातील ११८ पेट्रोलपंप वाहनांच्या इंधनांची गरज भागवत आहेत. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूककोंडी आणि प्रदूषणसारख्या समस्या वाढल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून शासनाकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे.
वाहन ही प्रत्येकाचीच गरज बनली आहे. शिक्षणापासून नोकरी, व्यवसायासाठी वाहनाचा वापर अपरिहार्य बनला आहे. त्यामुळे आता प्रत्येक घरात एक नव्हे तर सरासरी दोन दुचाकी दिसत आहेत. चारचाकी वाहनांची संख्याही वाढली आहे. वाहनांचा वापर वाढल्याने आता सर्वत्रच वाहतूककोंडी होण्याची समस्या वाढू लागली आहे. पेट्रोल-डिझेलवर धावणाऱ्या वाहनांमुळे प्रदुषणाची समस्याही वाढत आहे. यावर उपाय म्हणून सीएनजी इंधनाचा वापरही होत आहे. वर्षभरातील मुहुर्तावर मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरात जिल्ह्यात विविध प्रकारची २५ हजार वाहने रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वाहनांची संख्या पाच लाखांवर गेली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात विविध वाहनांची एकूण संख्या ४ लाख ९९ हजार १०२ एवढी झाली आहे. वाहनांची इंधनाची गरज भागवण्यासाठी ११८ पेट्रोलपंप कार्यरत आहेत. यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पंपांचा समावेश आहे.
चौकट १
जिल्ह्यात यावर्षीसह एकूण वाहनांची आकडेवारी
वाहन प्रकार* यावर्षीची संख्या* एकूण संख्या
दुचाकी* ६, ९०४* ३,३४,५६४
तीनचाकी* ४०१* ३१,०७९
चारचाकी* १,९८१* १०२,८६७
इतर वाहने* १६८* २८,४९२
---
कोट
वाहन आता प्रत्येकासाठीच आवश्यक झाले आहे. त्यामुळे दरवर्षीच पेट्रोल, डिझेल आणि आता सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढू लागली आहे. पर्यावरणपूरक म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहिले जात असल्याने या वाहनांची संख्याही आता वाढतच राहणार आहे.
- राजवर्धन करपे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी