सेवाभावी ‘श्री रत्नागिरीचा राजा मंडळ’
सात वर्षात ३४ लाखांची मदत ; कार्यातून नवा आदर्श
राजेश शेळके : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मित्रमंडळाने सामाजिक कार्याचा नवा आदर्श इतर मंडळांपुढे ठेवला आहे. नवसाला पावणाऱ्या राजाचे महात्म्य आहेच; परंतु या मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समाजातील गरजूंना मदत करत सेवाभाव जपला आहे. अपघातग्रस्त, पूरग्रस्त, लातूर येथील दुष्काळग्रस्तांना मदत केली, कुष्ठरुग्णांना घरे बांधण्यासाठी साहित्य दिले, अनेकांना वैद्यकीय आणि आर्थिक मदत दिली. एवढेच नाही तर दामले विद्यालयातील अंगणवाडी, बालवाडीतील ८ सेविका आणि मदतनीस यांचे गेली २ वर्षे हे मंडळ पगार देऊन शैक्षणिक कार्याला मोठा हातभार लावत ७ वर्षांमध्ये ३४ लाखांची आर्थिक मदत केली.
रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर सर्कलमध्ये श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाची सुरुवात २०१८ पासून झाली. लालबागचा राजाची मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकाराकडून ही मूर्ती तयार केली जाते. गणेशोत्सवाच्या १० ही दिवसांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी असते. मारूती मंदिर सर्कलमध्ये शिवसृष्टी उभी केल्यामुळे आंब्याखाली वाहतुकीला कोणताही अडथळा न होता मंडप घालून सजावट करण्यात आली आहे.
मंडळाने अनेक गरीब आणि गरजू अपघातग्रस्तांना आर्थिक मदत केली आहे. चिपळूणमध्ये जेव्हा महापूर आला तेव्हा मंडळाकडून पाणी आणि गरजेच्या साहित्याचे वाटप झाले होते. लातूरमध्ये पडलेल्या दुष्काळावेळी मोठ्या प्रमाणात जनावरांना चारा व गरजूंना आर्थिक मदत या मंडळाने केली. सिंधुदुर्गातील दशावतारी मंडळाला कोरोना काळात तीन लाखांची आर्थिक मदत केली. रत्नागिरीतील कुष्ठरुग्णांना हक्काचं घर मिळावे यासाठी घराला लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले. गणपतीपुळे येथे उधाणादरम्यान स्थानिक स्टॉलधारकांचे स्टॉल उधाणात वाहून जाऊन नुकसान झाले होते. त्यांना ३ लाखाची मदत दिली. आरे-वारे येथे अपघातात मृत झालेल्या गरीब कुटुंबातील व्यक्तीच्या वारसांना आर्थिक मदत दिली. हरचिरीमध्ये वादळात घर कोसळल्या व्यक्तीला ३० हजारांची मदत केली.
---
चौकट
अंगणवाडीसेविका दिला पगार
एवढेच नाही, तर या मंडळाने पालिकच्या दामले विद्यालयातील बालवाडी आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस विनापगार काही महिने मुलांना शिकवत होत्या. मंत्री उदय सामंत यांना जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा मदतनीस आणि सेविकेचा आर्थिक भार श्री रत्नागिरीचा राजा मंडळाने उचलला. एक-दोन नव्हे तर ८ कर्मचाऱ्यांचा पगार गेली २ वर्षे हे मंडळ करत आहे. दरमहा ४८ हजार मंडळ आर्थिक मदत करून शैक्षणिक क्षेत्रालाही हातभार लावत आहे.
चौकट...
मंडळाची दरवर्षीची मदत
२०२०* ६ लाख
२०२१* ३ लाख ९४ हजार
२०२२* १ लाख
२०२३* ८ लाख ८२ हजार
२०२४* १२ लाख ३० हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.