ग्रामीण अर्थव्यवस्था ढासळतेय
शेतीचा पाया खिळखिळाः नवी पिढी चालली शहराकडे
तुषार सावंतः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २८ः गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण अर्थव्यवस्था ढासळू लागली आहे. मूलभूत गरजांची वाढती मागणी, छोट्या गावांना लागलेले शहरीकरणाचे वेध, रेशनवर वाटप होणारे मोफत धान्य याचबरोबर शिक्षणामुळे सुशिक्षित वर्ग नोकरीसाठी शहराकडे स्थलांतरित होत असल्याने शेती आणि शेतीपूरक व्यवसाय हळूहळू कमी होऊ लागले आहेत. ग्रामीण भागात गरजेपुरती शेती होऊ लागली आहे. शेतीचे व्यावसायिकीकरण फारसे होत नसल्याने आणि दिवसेंदिवस यांत्रिकीकरणाचा उपयोग वाढू लागल्याने पर्यायी गोधनाचा वापर कमी होऊन शेती आणि शेतीपूरक व्यवसाय दुर्लक्षित होऊ लागला आहे. त्यामुळे ही ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी बनताना दिसत आहे.
देशातील औद्योगिक क्रांतीपूर्वी ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णतः शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून होती. कोकणामध्ये शेती ही तुकड्या तुकड्याची तरीही मूलभूत गरज भागवणारी आणि वर्षभर धान्य पुरवठा करणारी विकसित झाली होती. अगदी डोंगर भागापर्यंत शेती कसली जात होती. पारंपरिक पद्धतीची बियाणे, रब्बी आणि खरीप हंगामातील शेती, शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी गोधनाचा होणारा वापर हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया होता. ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमानही दर्जेदार होते; परंतु जसा काळ बदलत गेला, शिक्षणाच्या सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या, तशी गावातली तरुण पिढी शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करू लागली. शिक्षण घेतल्यानंतर शेतीमध्ये काम न करता नोकरीच्या मागे लागून मोठ्या नोकऱ्या आणि गलेलट्ट पगार मिळवणे, हे उद्दिष्ट झाले. एकत्रित कुटुंब पद्धती विस्तारित होऊन स्वतंत्र कुटुंब पद्धती निर्माण होऊ लागली. त्यामुळे शेतीचे तुकडे तुकडे वाटप होऊ लागले. तरुण पिढी नोकरीसाठी मोठ्या शहराकडे वाटचाल करू लागली. त्यामुळे ग्रामीण भागात वयोवृद्ध शेतकरी कसाबसा जीवन जगू लागला. ही परिस्थिती आता दिवसेंदिवस अधिकच जटील होऊ लागली आहे. ग्रामीण भागातील तरुण पिढी शेतीपासून दूर गेली आहे. याचे कारण मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान गावापर्यंत पोहोचले आहे. माध्यमिक शिक्षणाच्या आणि उच्च शिक्षणाच्या सुविधा जवळच्या शहरात निर्माण झाल्या आहेत. शाळा, महाविद्यालयांमधून गेल्या काही वर्षांत शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचे शिक्षण मिळालेले नाही.
तालुक्याच्या ठिकाणी जे छोटे गाव होते, तेथे शहरीकरण झाले. शहरीकरणामुळे शेतजमीन टोलेजंग इमारतींसाठी विकली जाऊ लागली. त्यामुळे छोटी शहरेही आता विस्तारित होऊ लागली आहेत. ग्रामीण भागातून स्थलांतरित होणारा तरुण निमशहरी भागांमध्ये आपले वास्तव्य करू लागला आहे. याचे कारण निमशहरी भागामध्ये छोटे-मोठे व्यवसाय उभे राहत आहेत.
ग्रामीण भागामध्ये पूर्वीच्या काळात जी पारंपरिक शेती होत होती, ते विषमुक्त अन्न होते; परंतु जसा काळ बदलत गेला, तसा ग्रामीण भागातही शेतीमध्ये अमुलाग्र बदल झाला. रासायनिक खतांचा वाढलेला वापर, सुधारित आणि संकरित बियाण्यांचे उत्पादन यामुळे पारंपरिक शेतीचे उत्पन्न वाढले. साहजीकच गरजेपुरती शेती होऊ लागल्याने जमिनीचे पडक्षेत्र वाढत गेले. पूर्वीच्या काळात डोंगरमाथ्यावर शेती केली जात होती; परंतु आता ग्रामीण भागातील असा डोंगर भाग शासनाच्या वनविभागाच्या मालकीचा झाला. यामुळे जंगलतोडही मोठ्या प्रमाणात झाली. निसर्गाचे चक्र बदलून गेले. त्याचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर पडला आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसायातून शेतकरी वर्षभर पुरणारे धान्य उत्पादित करत होता; परंतु आता यांत्रिकीकरणामुळे कमी वेळेत, कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन मिळू लागले आहे. यांत्रिकीकरण आले तरी ग्रामीण भागामध्ये शेतीचे व्यावसायीकरण झालेले नाही. शिक्षणामुळे गावात शेतमजुरांचा अभाव आहे. कुक्कुटपालन, दूध व्यवसाय, शेळी-मेंढी पालन व अन्य व्यवसाय जे शेतीला पूरक होते, त्याकडे तरुण पिढीने पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
-----------
चौकट
ही आहेत कारणे
* सरकारी मोफत योजना
* शेती-शेतीपूरक व्यवसायांकडे दुर्लक्ष
* शेतीचे वाढते यांत्रिकीकरण
* शेतमजुरांचा अभाव
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.