-rat१p२१.jpg-
२५N८८६७८
राजापूर ः घाटामध्ये पसरलेले दाट धुके.
-rat१p२२.jpg-
२५N८८६७९
राजापूर ः घाटातून दिसणाऱ्या नयनरम्य अशा हिरव्यागार डोंगररांगा.
-----
अणुस्कुरा घाट-विकासवाट--मालिका भाग १----लोगो
रत्नागिरी जिल्हा आंबा घाटमार्गासह अणुस्कुरा घाटमार्गाने पश्चिम महाराष्ट्राला जोडला गेला आहे. राजापूर तालुक्यातून जाणारा अणुस्कुरा घाट शॉर्टकट म्हणूनही ओळखला जातो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी अणुस्कुरा घाट महत्त्वाचा ठरतो. अलौकिक निसर्गसौंदर्य लाभलेल्या या घाटात दुर्मिळ निसर्गसंपदा आणि इतिहासकालीन ठेवा यांचा खजिना दडलेला आहे. त्यामुळे अणुस्कुरा घाट वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. वाहनचालकांसह पर्यटक आणि अभ्यासकांसाठी हा घाट पसंतीचा ठरत आहे. पावसाळ्यात आंबा घाटात दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाली, तर अणुस्कुरा घाट पर्यायी मार्ग म्हणून उपयुक्त ठरतो. मात्र, या घाटाच्या दुरुस्तीविषयी सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. पर्यटन वाढावे यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. अणुस्कुरा घाटाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही लेखमालिका आजपासून...
- राजेंद्र बाईत, राजापूर
-----
निसर्गसंपन्न अणुस्कुरा घाटाचा विकास दुर्लक्षित
पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा शॉर्टकट ; दुरुस्तीबाबत प्रशासनाची अनास्था
राजापूर, ता. १ : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला अणुस्कुरा घाट ९०च्या दशकात पश्चिम महाराष्ट्रात ये-जा करण्यासाठी तयार करण्यात आला. ओणी–पाचल–येरडव–करक–पांगरी–अणुस्कुरा असा हा मार्ग माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री (कै.) ल. र. तथा भाई हातणकर यांच्या कार्यकाळात साकार झाला. नागमोडी वळणांचा हा सुमारे नऊ किमीचा रस्ता अल्प वेळात कोल्हापूर गाठण्यासाठी उपयुक्त ठरतो. तरीही या घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आजवर अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.
मागील दीड दशकापासून रखडलेल्या मुंबई–गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे मुंबईहून कोकणात येणारी वाहने पुणेमार्गे अणुस्कुरा घाटातून येण्याला प्राधान्य देत आहेत. नागमोडी वळणांनी भरलेल्या या मार्गावरून प्रवास करताना, विशेषतः पावसाळ्यात, दाट धुक्याने लपेटलेले डोंगर, हिरवाईने नटलेले परिसर आणि उंचावरून फेसाळत कोसळणारे धबधबे यांचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते.
गोव्याला जाणारेही अनेक पर्यटक अणुस्कुरा घाट मार्ग अवलंबत आहेत, त्यामुळे या घाटातील वाहतूक वाढत चालली आहे. तसेच, घाटात असलेल्या काही ऐतिहासिक शिवकालीन पायवाटांमुळे अभ्यासक आणि पर्यटकांची पावले तिकडे वळत आहेत.
मात्र, या घाटात सतत दरडी कोसळत असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनतो. याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतल्यास, मुंबई–गोवा महामार्ग किंवा मिर्या–नागपूर मार्गाला पर्याय म्हणून अणुस्कुरा घाट उपयोगी ठरू शकतो.
---
चौकट
घाटातील शिवकालीन ठेवा
शिवकाळात रहदारीसाठी वापरल्या गेलेल्या या पायवाटेचा इतिहास उल्लेखनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोकणातील मोहिमांचे संदर्भ येथे आढळतात. छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी आलेले मुघल सैन्यही याच मार्गाने कोकणात उतरल्याचे सांगितले जाते. या पायवाटेवर प्राचीन पांडवकालीन मंदिर, मराठी भाषेचा अमूल्य ठेवा, शिवकाळातील चौथाई सरदेशमुखांचे अधिकार अधोरेखणारा सुमारे दीडशे–दोनशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक शिलालेख आणि सतत वाहणारा पाण्याचा झरा असे अनेक ऐतिहासिक ठेवे असूनही ते दुर्लक्षित राहिले आहेत. रायपाटण येथील मनोहर खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी या परिसराची स्वच्छता करत असताना, येरडव ते अणुस्कुरा या पायवाटेवरील हा ऐतिहासिक ठेवा उजेडात आला.
दृष्टिक्षेपात
* अणुस्कुरामुळे राजापूर तालुका घाटमाथ्याशी जोडला
* कमी कालावधीमध्ये घाटमाथ्यावरील भागात जा-ये करणे शक्य
* शॉर्टकट मार्ग म्हणून ओळख, चालकांचे मार्गाला प्राधान्य
* नागमोड्या वळणांचा सुमारे ९ किमीचा मार्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.