swt911.jpg
90374
सावंतवाडी : माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासोबत कंत्राटी सफाई कामगार.
सफाई कामगारांचे १५ पासून ‘बेमुदत’
वेतनप्रश्नी आक्रमक : सावंतवाडी पालिकेकडून आश्वासनपूर्ती नाही
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ : शहराची स्वच्छता राखण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या सुमारे ६० कंत्राटी सफाई कामगारांना गणेशोत्सव काळातही पगार मिळालेला नाही. गेल्या तीन वर्षांपासून भविष्य निर्वाह निधी (पीएफ) थकीत असून, पंधरा दिवसांपूर्वी एक महिन्याचा पगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळले नाही. या निषेधार्थ कामगारांनी सोमवार (ता. १५) पासून बेमुदत उपोषण छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील गुरुकुल येथे आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कंत्राटी सफाई कामगारांची बैठक झाली. या बैठकीत पालिकेच्या ढिसाळ कारभारावर जोरदार टीका करण्यात आली. प्रशासक तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या उपस्थितीत पगार व पीएफ देण्याचे आश्वासन दिले होते. तरीसुद्धा पंधरा दिवस उलटूनही केवळ तांत्रिक कारणे सांगून अधिकारी हात झटकत असल्याचा आरोप कामगारांनी केला. सणासुदीच्या काळात पगार न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
थकीत पीएफबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने कामगारांनी आता न्यायालयाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात कायदेतज्ज्ञ ॲड. अनिल निरवडेकर यांनी मोफत कायदेशीर मदत करण्याची तयारी दर्शवली असून, संपूर्ण न्यायालयीन कामकाज ते पाहणार आहेत. कामगारांनी त्यांचे आभार मानले. १५ पासून सुरू होणाऱ्या या बेमुदत उपोषणात माजी नगराध्यक्ष साळगावकर यांच्यासह माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, आफ्रोझ राजगुरू, मनोज घाटकर आणि गुरुकुलचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे.