कोकण

मालवणला हवे आणखी पाचपट पाणी

CD

मालवणला हवे आणखी पाचपट पाणी
भविष्याची गरजः दुर्लक्षित जलस्त्रोतांच्या सक्षमीकरण हवे
प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ : सिंधुदुर्गची पर्यटन राजधानी असलेल्या मालवणला दिवसाला पाच मिलियन लीटर पाण्याची गरज आहे; मात्र सध्या एक मिलियन लीटर इतकाच पाणी पुरवठा नळ योजनेद्वारे होतो. भविष्यातील वाढ लक्षात घेता, येथील पाणी उपलब्धतेबाबत ठोस मार्ग काढण्याची गरज आहे.
मालवण शहराला धामापूर नळपाणी योजनेवरून पाणी पुरवठा होत आहे. शहरात खासगी तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरी असल्याने ७५ टक्के भागात पाणीटंचाईची समस्या भेडसावत नाही. केवळ आडवण, आडारी या भागात पाण्याची समस्या असली तरी धामापूर नळपाणी योजनेवरून त्यांना पाणी पुरवठा केला जातो. शहरात दिवसाला ५ मिलियन लिटर पाण्याची मागणी असताना केवळ १ मिलियन लिटर पाणी नळपाणी योजनेवरून उपलब्ध होत आहे. भविष्याचा विचार करता पाण्याची मागणी वाढणार आहे. या अनुषंगाने शहरातील ज्या ज्या भागात दुर्लक्षित राहिलेले पाण्याचे जे मोठे स्रोत आहेत ते पुनर्जीवित करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहराचा विचार करता स्थानिक नागरिकांच्या खासगी विहिरी सुरुवातीपासूनच आहेत. त्याचबरोबर पालिकेच्या माध्यमातून सार्वजनिक विहिरीही बांधण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या काळाचा विचार करता शहरात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने कधीही पाणीटंचाईची समस्या भेडसावली नाही. मात्र, पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याचबरोबर व्यवसायांमध्येही वाढ झाली. परिणामी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. हॉटेल व्यवसायिक अन्य वाणिज्य प्रकारचे व्यवसाय करणारे व्यावसायिक तसेच ज्यांच्याकडे खासगी विहिरी नाहीत अशा नागरिकांकडून पाण्याची मागणी होऊ लागली. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मालवण शहरासाठी विशेष बाब म्हणून शंभर टक्के निधीतून धामापूर नळपाणी योजना राबविली. त्यानुसार गेली २५ हून अधिक वर्षे मालवण शहरासह कुंभारमाठ, शासकीय तंत्रनिकेतन या भागात या नळपाणी योजनेवरून पाणीपुरवठा केला जात आहे.
धामापूर नळ पाणी योजनेवरून नागरिकांना व्यावसायिकांना नळ जोडण्या देण्यात आल्या. त्यावर पाणी मीटरही बसविण्यात आले. मात्र, ज्या प्रमाणात नागरिकांकडून जोडण्या घेणे आवश्यक होते. ज्यांच्याकडे खासगी विहिरी आहेत. त्यांनीही नळ जोडणी घेणे अपेक्षित होते. मात्र, पाण्याचे पैसे भरावे लागणार अशी भावना काहीजणांमध्ये निर्माण झाल्याने अनेक नागरिकांनी नळ जोडणी करून घेतली नाही. परिणामी नळजोडण्याची संख्या कमी असल्याने गेली बरीच वर्षे ही नळपाणी योजना पालिकेला ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालवावी लागत आहे. या योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने याचा आर्थिक भुर्दंड पालिकेला बसत आहे. धामापूर नळपाणी योजनेबरोबरच पालिकेच्या राजकोट नळपाणी योजनेवरून ग्रामीण रुग्णालय, पोलीस वसाहत, रॉक गार्डन, शासकीय विश्रामगृह या भागात पाणीपुरवठा केला जात आहे. गेली बरीच वर्ष ही नळ पाणी योजना यशस्वीपणे कार्यरत आहे.
एप्रिल, मेमध्ये धामापूर नळपाणी योजनेवरून शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा केला जातो. धामापूर येथील पाणी साठवण होणाऱ्या विहिरीत कमी पाणी येत असल्याने एक दिवस आड पाणीपुरवठा या काळात करावा लागत आहे. मार्च महिन्यापासून शहर, कुंभारमाठ या भागाबरोबरच आनंदव्हाळ या गावासही पाणीपुरवठा केला जात आहे.
धामापूर नळपाणी योजना अस्तित्वात येऊन २५ वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. यात नळपाणी योजनेचे पाईप जुनाट बनल्याने सातत्याने पाईपलाईन फुटण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे शहरात पाणीपुरवठा करताना मोठी समस्या भासते. या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती राज्यस्तर नगरोत्थान महा अभियानांतर्गत मालवण शहराचा पाणीपुरवठा प्रकल्प वृद्धिंगत करण्याचे सुमारे ४३ कोटी २६ लाख रुपयांचे काम मंजूर झाले आहे. यानुसार धामापूर नळपाणी योजनेच्या नवीन पाईपलाईन बसवण्याच्या कामास सुरुवात झाली असून २०२७ पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.
धामापूर नळपाणी योजनेत नवीन पाईपलाईन बसवण्याच्या कामात काही ठिकाणी खासगी जमिनींमुळे अडचणी भेडसावत आहेत. या संदर्भात स्थानिक नागरिकांशी चर्चा, योग्य समन्वय साधून त्यातून मार्ग काढण्याचे काम पालिका प्रशासनाच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे हे कामही लवकरच मार्गी लागेल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
मालवण शहराची लोकसंख्या सुमारे १८ हजाराच्या आसपास आहे. शहरात दर दिवसा पाच मिलियन लिटर पाण्याची आवश्यकता आहे तर प्रत्यक्षात धामापूर नळपाणी योजनेवरून एक मिलियन लिटर पाणी उपलब्ध होत आहे तर अन्य विहिरींच्या माध्यमातून एक मिलियन लिटर पाणी उपलब्ध होत आहे. शहरात २२६५ खासगी तर ४६ सार्वजनिक विहिरींच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.
शहरात बारमाही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असते उन्हाळ्यात विहीर आटली अशी एकही घटना इतक्या वर्षात आढळून आलेली नाही. मात्र भविष्यातील वाढते पर्यटन, व्यवसाय, लोकसंख्या याचा विचार करता पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करता शहरातील विविध भागांमध्ये जे दुर्लक्षित राहिलेले जिवंत असे पाण्याचे स्त्रोत आहेत. त्या स्त्रोतांना पुनर्जीवित करणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून पालिका प्रशासनाने पावले उचलायला हवीत. त्याचबरोबर खासगी सार्वजनिक विहिरींमधील गाळ दरवर्षी काढण्याची कार्यवाही व्हायला हवी.
मालवण शहरात पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी खासगी विहिरीचा वापर केला जायचा. मात्र, गेल्या काही वर्षात आडवण, देऊळवाडा, धुरीवाडा यांसह किनारपट्टी लगतच्या नागरिकांच्या विहिरीचे पाणी मचूळ बनल्याचे दिसून येते. त्यामुळे या भागातील नद्यामधील गाळ काढण्याबरोबर त्या भागात खार बंधारे बांधण्याची गरज आहे. याची कार्यवाही झाल्यास मचूळ पाण्याची समस्या दूर होईल.

चौकट
पाच गावांना होणार फायदा
मालवण शहराच्या लगत असलेल्या गावांमधूनही धामापूर नळपाणी योजनेचे पाणी उपलब्ध व्हावे, अशी मागणी करण्यात येत होती. तारकर्ली, देवबाग, वायरी भूतनाथ, कोळंब या गावांमध्ये पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेत त्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी धामापूरच्या नवीन नळपाणी योजनेवरून पाणीपुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार सद्यस्थितीत सुरू असलेल्या धामापूरच्या नवीन नळ योजनेवरून मालवण शहरासह कुंभारमाठ या गावाबरोबरच तारकर्ली, देवबाग, कोळंब, वायरी भूतनाथ या गावांनाही पाणीपुरवठा भविष्यात केला जाणार आहे.
------------
swt916.jpg
90407
अमोल काटवळ

कोट
मालवण शहरात तसेच शहरालगतच्या कुंभारमाठ या गावांना गेली काही वर्षे धामापूर नळपाणी योजनेवरून पाणीपुरवठा केला जात आहे. शहरास मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. मात्र, काही वेळा वीज पुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीज पुरवठा तसेच पाईपलाईन फुटणे यांसारख्या प्रकारांमुळे नागरिकांना व्यावसायिकांना पाणीपुरवठा करताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, आता नव्याने धामापूर नळपाणी योजनेवर नवीन पाईपलाईन बसवण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. येत्या दोन वर्षात हे काम मार्गी लागेल. त्यानंतर जुनी पाईपलाईन बंद करून नवीन पाईप लाईनवरून नागरिकांना व्यावसायिकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. सातत्याने वीज पुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीज पुरवठा या समस्येवर मात करण्यासाठी ३३ केव्हीचा स्वतंत्र फीडर या योजनेवर बसवण्याची कार्यवाही केली जाणार आहे. भविष्यात या नळपाणी योजनेवरून तारकर्ली, देवबाग, वायरी भूतनाथ, कोळंब या गावांनाही पाणीपुरवठा केला जाणार आहे.
- अमोल काटवळ, जलनि:सारण व स्वच्छता अभियंता, मालवण पालिका
-------------
swt917.jpg
90408
महेश कांदळगावकर

कोट
मालवण शहरातील जनतेने शंभर टक्के नळजोडणी घ्यावी या उद्देशाने धामापूर नळपाणी योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, शहरातील आडारी, आडवण हे दोन भाग सोडले तर अन्य भागात मुबलक प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे या योजनेवरून नागरिकांनी जोडण्या फार कमी घेतल्या गेल्या आहेत. परिणामी पालिकेला गेली काही वर्षे ही नळपाणी योजना ''ना नफा, ना तोटा'' या तत्त्वावर चालवावी लागत आहे. नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि नळपाणी योजनेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याची आवश्यकता आहे किंवा शासनाकडून निधी उपलब्ध करून घेणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून पालिका प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत.
- महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष
-------------
swt918.jpg
90409
गणेश कुशे

कोट
धामापूर नळ पाणी योजनेचे नव्याने काम होत आहे. मात्र, ज्या प्रमाणात पाणी उपलब्ध व्हायला हवे तेच जर मिळत नसेल तर या योजनेचा उपयोग काय? कारण स्थानिक ग्रामस्थांनी धामापूरचे पाणी किती प्रमाणात घ्यावे याचे बंधन घातलेले आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास कसे पाणी उपलब्ध होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या समस्येवर जर कायमस्वरूपी मात करायची असेल तर कुंभारमाठ येथील डोंगुर्ला तलावातील गाळ काढला गेल्यास मुबलक प्रमाणात पाणीसाठा होऊ शकतो. त्याचबरोबर शहरातील राजकोट येथे दोन एकर परिसरात शासनाच्या मालकीची चांभार कोंड आहे. ही कोंड जर तलाव म्हणून विकसित केल्यास म्हणजेच तलाव बांधणे, त्यातील गाळ काढणे ही कामे करायला हवीत. याठिकाणी पावसाचे पाणी साठवू शकलो तर वर्षभर याभागात पाणी उपलब्ध असेल. याचा फायदा लगतच्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मिळणार आहे. चांभार कोंडमध्ये पावसाचे पाणी साचते मात्र ते वाहून जाते. यात गाळ, चिखल आहे. शिवाय सांडपाणी सोडण्यात येत असल्याने या पाण्याचा पिण्यासाठी वापर होत नाही. याठिकाणी काहींनी भर टाकली असून अतिक्रमणही झाले आहे. असे शहरातील जे पाण्याचे स्त्रोत आहेत ते शोधून पुनर्जीवित केल्यास शहराला मुबलक प्रमाणात पाणी मिळेल. शिवाय शहराची पाण्याची गरज भागवून आपण पाणी लगतच्या गावांना देऊ शकतो एवढी ताकद आपल्या शहरात आहे. त्यामुळे केवळ नळपाणी योजना करून भागणार नाही तर पाण्याचे अन्य स्त्रोतांचा शोध घ्यायला हवा.
- गणेश कुशे, स्थानिक नागरिक
------------
swt919.jpg
90410
सौगंधराज बादेकर

कोट
मालवण शहरात हॉटेल व्यवसायिकांना धामापूर नळपाणी योजनेवरून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, तो काही कालावधीसाठीच असतो. हॉटेल व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असताना ते उपलब्ध होत नाही. कारण व्यावसायिक मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवू शकत नाही. शिवाय ऐन पर्यटन हंगामात एक दिवसा आड पाणीपुरवठा केला जात असल्याने विकत पाणी घ्यावे लागते. त्यामुळे नियमित व मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा कसा करता येईल याचे नियोजन पालिकेकडून व्हायला हवे.
- सौगंधराज बादेकर, हॉटेल व्यावसायिक
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT