सावंतवाडीत पोलिसांची धडक मोहीम
मटका जुगारवर छापा ः चार ठिकाणच्या कारवाईत रोकडीसह मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ः येथील पोलिसांनी मटका जुगारावर धडक मोहीम राबवली आहे. सलग दोन दिवस तालुक्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकून कारवाई केली. या मोहिमेत रोकड आणि मोबाईलसह अनेकांना पकडण्यात आले.
सांगेली जायपीवाडी बाजारात संदीप सखाराम लाड (रा. गुरगुटवाडी) याला मोबाईलद्वारे आकडे घेताना १,२५० रुपये आणि १० हजार किमतीचा मोबाईलसह रंगेहात पकडले. तो आकडे संशयित सुनील आडीवरेकर (रा. सावंतवाडी) याला पाठवत असल्याने दोघांवर कारवाई करण्यात आली. मळेवाड जकात नाका येथे आनंद यशवंत नाईक (६२, रा. मळेवाड-नाईकवाडी) याला मटका जुगारावर २,४३० रुपयांसह पकडण्यात आले. त्याचप्रमाणे महेश रमाकांत परब (५२, रा. शिरोडा, ता. वेंगुर्ला) याच्याकडे २,५२० रुपये व ७ हजार किमतीचा मोबाईल आढळून आला. हे आकडे ते संशयित हनु देऊलकर (रा. सावंतवाडी) याला पाठवत असल्याचे निष्पन्न झाल्याने तिघांवर कारवाई झाली.
आरोंदा बाजारपेठेत अमोल प्रभाकर वीर्नोडकर (४८, रा. आरोंदा) हा ३४० रुपयांसह मटका खेळताना मच्छी मार्केटजवळ पकडला. चौकशीत त्याने आकडे बुकि राजेंद्र धर्माजी रेडकर (६३, रा. भोमवाडा, हरमल, गोवा) याला पाठवत असल्याचे उघड झाल्याने त्या दोघांवरही कारवाई झाली. एकूण चार ठिकाणी मटका जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पोलिसांनी कारवाई केली आहे.