-ratchl९१.jpg-
२५N९०४५५
चिपळूण ः शहरात नदीकिनारी असलेली नगरपालिकेची स्वच्छतागृहे.
-----------
सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती ऐरणीवर
चिपळूण शहरात ७२ हून अधिक ; पालिकेतर्फे संयुक्त सर्वेक्षण सुरू
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ ः शहरहद्दीतील ७२हून अधिक सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला असताना काही स्वच्छतागृहांचा मैला थेट नदीपात्रात जात असल्याने डोकेदुखीचा विषय बनला आहे. अशा स्वच्छतागृहांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्यादृष्टीने पालिकेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. बांधकाम, आरोग्य व पाणीपुरवठा विभागामार्फत संयुक्तपणे सर्व्हेक्षण करून त्याचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.
शहराच्या विविध विभागात घरगुती स्वच्छतागृहांवर नगरपालिकेने अधिक लक्ष केंद्रीत केल्यानंतर सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर कमी होऊ लागला आहे; परंतु नागरिकांची गरज ओळखून ही सुविधा आजही पालिकेने शहरात अनेक ठिकाणी सुरू ठेवली आहे. शहराच्या विविध प्रभागात ७२हून अधिक सार्वजनिक स्वच्छतागृह असून, त्यातील काहींचा वापर बंद झाला आहे; मात्र दाट वस्तीतील स्वच्छतागृहांवर अजूनही ताण कायम आहे. विशेषतः बाजारपेठ परिसर तसेच गोवळकोट, पेठमाप, मुरादपूर, उक्ताड, शंकरवाडी या नदीकिनारी असलेल्या भागात जागेअभावी घरगुती स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे. परिणामी, तेथील कुटुंबांना सार्वजनिक स्वच्छतागृहांवर अवलंबून राहावे लागते; मात्र यातील काही स्वच्छतागृह नदीकिनाऱ्याला लागून आहेत. त्याचे सेफ्टीटॅंकदेखील आता नादुरुस्त व गळती लागलेले आहेत. अशा ठिकाणी दुर्गंधी पसरू लागल्याने परिसरातील नागरिकांच्या तक्रारी नगर परिषदेकडे येऊ लागल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते इनायत मुकादम यांनी देखील नगर परिषदेला पत्र देऊन ठोस उपाययोजनांची मागणी केली होती.
मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शहरातील सर्व स्वच्छतागृहांचा विषय गांभीर्याने घेतला आहे. या स्वच्छतागृहांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी बांधकाम, पाणीपुरवठा व आरोग्य विभागाला याबाबतचे संयुक्त सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरात तिन्ही विभागांमार्फत सर्व्हे करून त्याचा अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.
---------
कोट
चिपळूण शहरातील काही स्वच्छतागृहांचा वापर कमी झाला असला तरी ते नियमाप्रमाणे बंद करता येत नाहीत. जी स्वच्छतागृहे नादुरुस्त बनली आहेत त्याचे दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी बांधकाम, आरोग्य व पाणीपुरवठा विभागामार्फत त्या त्या आवश्यक सुविधा पुरवणार आहोत. त्यासाठीच संयुक्तपणे सर्व्हेक्षण केले जात आहे.
- सुजित जाधव, आरोग्य निरीक्षक, चिपळूण पालिका