swt923.jpg
90460
सिंधुदुर्गनगरीः येथे पत्रकार परिषदेत बोलताना भाजपच्या ओरोस मंडळाच्या महिला अध्यक्षा सुप्रिया वालावलकर. सोबत ग्रामपंचायत सदस्य राजश्री नाईक, तेजश्री राऊळ.
‘सिंधुदुर्गनगरी’साठी १ कोटी ३४ लाखांचा निधी
खड्डेमय रस्त्यांसह दिवाबत्तीची सुधारणा; गेली अनेक वर्षे होती मागणी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ः सिंधुदुर्गनगरीतील खड्डेमय रस्ते आणि अंधारामुळे नागरिकांनी दीर्घकाळ तोंड द्यावा लागलेला त्रास अखेर संपणार आहे. वर्षानुवर्षे झालेल्या दुर्लक्षानंतर पालकमंत्री, खासदार व आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाला पाझर फुटला असून, रस्ते व दिवाबत्तींसाठी एकूण १ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती भाजपच्या ओरोस मंडळ अध्यक्षा सुप्रिया वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील भाजपच्या वसंत स्मृती या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समिती सदस्य महेश पारकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष वालावलकर, ओरोस बुद्रुक ग्रामपंचायत सदस्या राजश्री नाईक, तेजश्री राऊळ आदी उपस्थित होते.
सौ. वालावलकर म्हणाल्या, “जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरीत रहिवासी संख्या वाढावी यासाठी प्राधिकरणने भूखंड वाटप केले होते. मात्र, रहिवाशांना मूलभूत नागरी सुविधा मिळाल्या नाहीत. रस्ते खड्डेमय झाले, दिवाबत्ती व्यवस्था सुरळीत नव्हती. नागरिक संघटनांनी तसेच विविध नेत्यांनी वारंवार मागणी करूनही प्राधिकरणाने दुर्लक्ष केले. अखेर पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे व आमदार निलेश राणे यांच्या लक्षवेधीमुळे निधी मिळाला. रस्त्यांचे खडीकरण करण्यासाठी १ कोटी ९ लाख रुपये, तर दिवाबत्ती व्यवस्थेसाठी २५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या कामांमधून एकूण सहा रस्त्यांची सुधारणा केली जाणार असून, कामांचा प्रारंभ दसऱ्याच्या काळात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. ”
या प्रयत्नात प्राधिकरण समिती सदस्य तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि महेश पारकर यांनीही पुढाकार घेतला.
चौकट
नागरी सुविधांसाठी स्वतंत्र निधी
ओरोस बुद्रुक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्राधिकरण हद्दीत सभामंडप उभारण्यासाठी २० लाख रुपयांचा निधी नागरी सुविधा योजनेंतर्गत मंजूर झाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी अखेर पूर्ण होणार असल्याचे सौ. वालावलकर यांनी सांगितले.