‘स्वाधार’ योजनेसाठी
ऑनलाईन अर्ज द्या’
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यामधील अकरावी व बारावी तसेच त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन पध्दतीने २० सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. संबंधित महाविद्यालयांनी स्वाधार योजनेबाबत पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्याबाबत आपल्या स्तरावरुन सूचित करण्यात यावे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग कार्यालयाशी संपर्क साधावा.
शासकीय वसतिगृहात
मोफत प्रवेशाची संधी
सिंधुदुर्गनगरी ः सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली व वेंगुर्ले अशा तीन ठिकाणी तसेच मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ले व देवगड असे पाच ठिकाणी आहेत. असे एकूण ८ शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीयसह इतर प्रवर्गाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामूल्य प्रवेश ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे. संबंधित पोर्टलवर १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यात यावे. भरलेला अर्ज डाऊनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे जमा करावेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे संपर्क साधावा.