swt1114.jpg
90805
कणकवली ः येथील हळवल वळणावर सातत्याने अपघात होत आहेत.
हळवल फाटा ‘ब्लॅक स्पॉट’
अपघातांची मालिका न थांबता सुरूच; उपाय ठरले निरुपयोगी; पथदीपांच्या आश्वासनांचाही विसर
राजेश सरकारेः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ११ः मुंबई महामार्गावरील कणकवली हळवल फाटा येथील वळणावरील अपघातांचा धोका टाळण्यासाठी छोटे गतिरोधक (रम्बलर) बसविण्यात आले. मात्र, अपघात टाळण्याच्या दृष्टीने हे गतिरोधकही व्यर्थ ठरले असून अपघातांचे सत्र कायम राहिले आहे. दरम्यान, गतवर्षी हळवल फाटा येथील धोकादायक वळणावर पथदीप बसविण्याची ग्वाही महामार्ग प्राधिकरणाने दिली होती. मात्र, त्याची कार्यवाही अद्याप झालेली नाही.
मुंबइ-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना तीव्र वळणे काढून तेथे नवीन रस्ता करणे गरजेचे होते. परंतु, असलेल्या जुन्या मार्गाचेच रूंदीकरण करून चौपदरीकरण करण्यात आले. परिणामी जुन्या मार्गावरील धोकादायक वळणे कायम राहिली आहेत. यात कणकवलीतील गडनदी संपल्यानंतरचा ९० अंशातील वळणाचा रस्ता सतत अपघातांना कारणीभूत ठरला आहे. मार्च २०२० मध्ये सिंधुदुर्गातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आणि नव्या महामार्गावरून वाहतूक सुरू झाली. यात कणकवली शहरालगतचा हळवल फाटा ‘अपघातांचा हॉटस्पॉट’ ठरला आहे. कणकवली शहरातील उड्डाणपूल संपल्यानंतरचा तीव्र उतार आणि त्यानंतर लगेच येणारे ९० अंशातील वळण याचा वाहन चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे वळण संपताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अवजड वाहने महामार्गावरच आडवी होत आहेत. मागील चार वर्षात या वळणावर पन्नासहून अधिक अपघात झाले. यात सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सततच्या अपघातानंतर गतवर्षी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन केले होते. यावेळी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी उड्डाणपुल संपल्यानंतरचा गडनदी पूल ते हळवल फाटा पर्यंतच्या रस्ता दुतर्फा स्ट्रीट लाईट, उड्डाणपूल ते वळणापर्यंत छोटे गतिरोधक, धोकादायक वळण असल्याबाबतचे फलक लावणे आदी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. यात छोटे गतिरोधक आणि धोकादायक वळण असल्याचे फलक लावण्यात आले. परंतु, पथदीप अद्यापही उभारलेले नाहीत.
हळवल फाट्यावर सतत अपघातांची मालिका होत असल्याने या ठिकाणची दुकानेही हटविली आहेत. गेले वर्षभर दिवसा अवजड वाहने नियंत्रित वेगाने जात होती. मात्र, अलीकडे दिवस आणि रात्रीही अवजड वाहने गतिरोधकांची पर्वा न करता वेगाने हाकली जातात. त्यामुळे येथील वळणावर अपघातांचे सत्र कायम राहिले आहे. या फाट्यावर प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस वारंवार अपघात होत असल्याने हळवल फाटा ते गडनदी पुलापर्यंत पथदीप बसवावेत, अशी मागणी वाहन चालकांसह कणकवलीतील नागरीक सातत्याने करत आहेत. महामार्ग अधिकाऱ्यांनी त्याअनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्तावही पाठवल्याचे गतवर्षी सांगण्यात आले होते. मात्र, गेल्या वर्षभरात पथदीप बसविण्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हळवल येथील वळणावर पथदीप नसल्याने अनेक वाहन चालकांना इथल्या वळण रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांचे सत्र कायम राहिले आहे.
महामार्ग चौपदरीकरणाचा आराखडा करताना कणकवली शहर वगळता उर्वरित भागात ६० मिटरचे भूसंपादन करण्यात आले होते. मात्र, कणकवली शहराप्रमाणेच लगतच्या गावातही ४५ मीटरप्रमाणे रूंदीकरण करा, यासाठी आंदोलने झाली. त्यामुळे हळवल येथील वळण तीव्र झाले. याखेरीज येथील वळण काढून सध्याचा महामार्ग थेट वागदे-ओसरगाव येथे जोडणे शक्य होते. परंतु, जुन्याच महामार्गाच्या रूंदीकरणाला प्राधान्य देण्यात आल्याने महामार्गावरील अपघातांचा धोका कायम राहिला आहे.
चौकट
अवजड वाहनांनाच अपघात
कणकवलीचा उड्डाणपूल संपतानाचा रस्ता ते हळवल तिठ्यापर्यंत छोट्या गतिरोधकांची रांग लावण्यात आल्याने या वळणावर छोट्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण आले आहे. छोटी वाहने या मार्गावरून नियंत्रित गतीने जात आहेत त्यामुळे गेल्या वर्षभरात या वळणावर छोटी वाहने अपघातग्रस्त झालेली नाही. परंतु, अवजड वाहने मात्र या गतिरोधकांना न जुमानता वेगाने जात आहेत. हीच वाहने पुढे जाऊन अपघातग्रस्त होत आहेत.
चौकट
पादचारी पुलाचा प्रस्ताव रखडला
शहरातील गड आणि जानवली नदीवरील पूल अरुंद आहेत. या पुलावर अपघात होत असल्याने दोन्ही पुलांच्या दुतर्फा पादचारी पूल उभारणीचा प्रस्ताव महामार्ग विभागाने मुख्य कार्यालयाकडे पाठवला होता. मात्र, गेल्या दोन वर्षात या प्रस्तावाला मंजूरी मिळाली नाही, त्यामुळे पुलावरून पादचारी, वाहन चालक यांची दाटी झाल्यास अपघातांची शक्यता निर्माण होत आहे.
कोट
हळवल फाट्यावरील तीव्र वळणाचा अवजड वाहन चालकांना अंदाज येत नाही. महामार्ग असल्याने ही वाहने वेगाने पुढे नेली जातात. यात हळवल फाटा येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहनांची गती कमी होण्यासाठी आणखी उपाययोजनांची गरज आहे. तसेच गडनदी पूल आणि वळणावर पथदीप बसविणे आवश्यक आहे.
- उत्तम राणे, वाहन व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.