- rat१२p१८.jpg-
२५N९१०३०
लांजा ः तालुक्यातील पालू येथे बांधलेला बंदवस्थेत असलेला बीएसएनएल टॉवर.
पालू, माचाळवासियांना नेटवर्कची प्रतीक्षा
ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष; भागातील टॉवर बनलेत शोभेचे बाहुले
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १२ ः तालुक्यातील पालू व माचाळ गावामध्ये बीएसएनएलची फोरजी तंत्रज्ञान सेवा मिळवण्यासाठी टॉवर बांधून २ वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे; मात्र बीएसएनएल नेटवर्क सेवा सुरू करण्यास संबंधित यंत्रणेला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे पालू येथील बीएसएनएल टॉवर शोभेची बाहुले बनला आहे.
लांजा तालुक्यातील पालू, माचाळ, परिसर सह्याद्री खोऱ्यांमध्ये दुर्गम भागात वसलेला आहे. येथील नागरिकांना तालुका अथवा अन्य ठिकाणी संपर्क साधण्यासाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही आहे. मोबाईल आहेत; पण नेटवर्क नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. नागरिकांच्या मागणीनुसार, डिसेंबर २०२३ मध्ये पालू गावात बेंडलवाडी येथे बीएसएनएल टॉवर बांधण्यात आला. सध्या हा टॉवर शोभेची बाहुले बनला आहे. टॉवर बांधून तीन वर्षाहून अधिक कालावधी लोटला तरी येथील जनतेला बीएसएनएलची नेटवर्क सुविधा देण्यात अद्यापही बीएसएनएलला मुहूर्त मिळेना झाला आहे. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेटून बंदावस्थेत असणारा टॉवर सुरू करा, अशी मागणी करण्यात आली; मात्र नागरिकांच्या मागणीकडे बीएसएनएलने कानाडोळा करत कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बीएसएनएल टॉवर बांधून काम पूर्ण होऊनही बंद ठेवायचा होता तर टॉवर बांधण्यात का आला..? असा संतप्त सवाल पालू ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने केला आहे. पालू येथे बांधलेला टॉवर लवकरात लवकर सुरू करावा अन्यथा आंदोलनाचा अवलंब करावा लागेल, असा इशारा पालू ग्रामस्थांनी दिला आहे.
लांजा तालुक्यात नवीन तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचे बीएसएनएलकडून सांगण्यात येत आहे; मात्र दोन वर्षापासून सुरू असलेली कामे पूर्ण झालेली नाहीत. कामे पूर्ण झाल्यास ग्राहकांना नेटवर्क सुरळीत मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
----
चौकट
१० नवीन टॉवरची भर
लांजा तालुक्यात बीएसएनएलचे २० टॉवर कार्यरत असून, त्यामध्ये अजून १० नवीन टॉवरची भर पडली आहे. माचाळ, चिंचुर्टी, पालू, हर्दखळे, वनगुळे, बापरे, गोविळ, वाडीलिंबू या ठिकाणी बीएसएनएलचे फोरजी नेटवर्कसाठी टॉवर नव्याने उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. माचाळ, पालू या ठिकाणी दोन वर्षभरापूर्वी बीएसएनएल टॉवर बांधण्यात आले आहेत. त्यामुळे पालू, चिंचुर्टी, माचाळ, हुंबरवणे या सह्याद्री खोऱ्यांमधील अतिदुर्गम भागात आता बीएसएनएलची रिंग लवकरच वाजणार आहे. येथील टॉवर अद्यापही सुरू झाले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
-----
कोट
लांजा तालुक्यात बीएसएनएलमार्फत विविध कामे सुरू आहेत; मात्र पाऊस जास्त असल्याने काही दिवस कामात अडथळे येत असल्याने काम थांबले होते. काही ठिकाणी काम झाले आहे तर काही ठिकाणी कामे सुरू आहेत. पालू, माचाळ येथील टॉवरच्या पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या आहेत. तांत्रिक अडचणी येत असल्याने टॉवर सुरू होत नाहीत. मोबाईल पथक प्रयत्न करत असून, वारंवार चाचणी केली जात आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर टॉवरची सेवा आठवडाभरात सुरू होईल.
- आरती जोशी, अधिकारी, बीएसएनएल, लांजा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.