rat12p22.jpg
91057
रत्नागिरीः तालुक्यातील कापणीयोग्य झालेली भातशेती.
--
भातरोपातील लोंब्या पोकळ !
अनियमित पावसाचा परिणाम; कडकडीत उन्हामुळे शेतकरी चिंतेत, गतवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ः जूनमध्ये लागवड झालेल्या सुरवातीच्या टप्प्यातील भातशेतीतून उत्पादन कमी मिळेल, अशी शक्यता शेतकरीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे. भात पसवण्याच्या दरम्यान गणेशोत्सवात पडलेल्या मुसळधार पावसाने लोंब्यात दाणे न भरण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याचा परिणाम भात उत्पादनावर होऊ शकतो.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. अनियमित पावसाचा परिणाम भातउत्पादनावर दिसत आहे. जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे गणले जातात. साधारणत: १० जूनपर्यंत पाऊस कोकणात नियमित होतो. या चार महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ३३६४.२२ मिलीमीटर पाऊस पडतो; परंतु सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पावसाचा लहरीपणा वाढल्यामुळे जूनच्या साधारणत: दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणारा पाऊस आता अगदी जूनच्या शेवटी सुरू होऊ लागला आहे.
यंदा मे महिन्यात सुमारे १७ दिवस धो-धो पडणाऱ्या पावसाने यंदा जून आणि जुलै महिन्यात निराशा केली; मात्र, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून जोरदार हजेरी लावल्याने यंदा या महिन्याची वार्षिक आकडेवारी ओलांडली आहे. या महिन्यात साधारणत: ८२९ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो; परंतु यंदा या महिन्यात ९५२ मिलिमीटर पाऊस पंधरा दिवसांत पडला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टअखेरपर्यंत ९० टक्के पाऊस पडला होता. यंदा याच कालावधीत ७९ टक्के प्रमाण आहे. त्यामुळे शेतीच्या कामाचा खोळंबा झाला. काहींना दुबार पेरणीही करावी लागली. हा अनियमितपणा अजूनही सुरूच आहे.
ऐन गणेशोत्सवात धो-धो पडलेल्या पावसाचा परिणाम लवकर भात लागवड झालेल्या क्षेत्राला बसला आहे. भात पसवण्याच्यावेळी पाऊस पडल्याने लोंब्यांमध्ये दाणाच तयार झालेला नाही. हे प्रमाण १० टक्के असेल, असा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला आहे. त्यानंतर भातपिकाला पोषक वातावरण होते. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला होता; परंतु सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कडकडीत ऊन पडण्यास सुरवात झाल्यामुळे बळीराजाची धास्ती वाढलेली आहे. सलग आठ दिवस पावसाने विश्रांती घेतली तर भविष्यात कातळावरील शेतीला फटका बसू शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, यंदा जिल्ह्यात सुमारे ४७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. त्यातील हळवी बियाणी सुमारे १० ते १२ टक्केच आहेत. रत्नागिरी ८ या जातीच्या निमगरवी जे १३० ते १३५ दिवसात तयार होते, त्याची सर्वाधिक लागवड केली गेली आहे. हळवी बियाणं कापणीसाठी तयार झाली आहेत. सध्याच्या वातावरणाचा फायदा या तयार भाताला होणार आहे.
चौकट
कापणीवर पावसाचे सावट
जिल्ह्यात १ जून ते आतापर्यंत सरासरी २,७४८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी याचदरम्यान ३३२० मिमीची नोंद झाली आहे. तुलनेत ६०० मिमीची तफावत अजूनही दिसत आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे निमगरवी प्रकारच्या भातबियाण्यांच्या कापणीत पावसाचा व्यत्यय येऊ शकतो.
------------
चौकट २
महिना साधारण सरासरी यंदाचा पाऊस (मिलिमीटर)
---------------------------------------
* जून ८१८ ७८२
* जुलै १२८६ ९१३
* ऑगस्ट ८२९ ९५२
-----------------------
कोट १
गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्याचवेळी हळवी बियाणे पसवण्याच्या स्थितीत होती. त्या बियाण्यामधून अपेक्षित उत्पादन मिळणार नाही; मात्र त्यानंतर वातावरण पोषक असल्याने भात व्यवस्थित येईल.
- जयंत फडके, ज्येष्ठ शेतकरी
कोट २
मागील महिन्यात काही ठिकाणी करपा आढळून आला होता; मात्र पावसामुळे त्याचा परिणाम जास्तकाळ राहिला नाही. सध्या पोषक वातावरण आहे. कापणीवेळी वातावरण कसे राहील त्यावर उत्पादन अवलंबून आहे.
- संतोष भडवळकर, शेतकरी, संगमेश्वर
कोट ३
यंदा भातलावणीला काही ठिकाणी विलंब झाल्याचे दिसत आहे; परंतु निमगरवी बियाण्यांची सर्वाधिक लागवड केल्याने त्याचा फायदा शेतकऱ्याला होणार आहे. बहुसंख्य ठिकाणची भातं पसवण्याच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे सध्याचे वातावरण त्याला पोषक आहे.
- विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.