rat5p6.jpg-
91384
प्रशांत परांजपे
वसा वसुंधरा रक्षणाचा...- लोगो
इंट्रो
पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप (पाणी), तेज (अग्नी), वायू आणि आकाश – या पाच मूलभूत तत्त्वांचा समूह. भारतीय तत्त्वज्ञानानुसार, विश्वातील प्रत्येक सजीव व निर्जीव वस्तू तसेच मानवी शरीर यांचा आधार ही पंचमहाभूते आहेत. मात्र, आता ह्याच पंचमहाभूतांनी आपला रौद्र अवतार दाखवायला सुरुवात केली आहे. त्यांच्यासमोर नतमस्तक होणे हीच काळाची गरज बनली आहे.
- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली
---------
पंचमहाभूतांपुढे नतमस्तक व्हा !
मानवाच्या अपरिमित आणि अनियंत्रित संचारामुळे पृथ्वीवर सर्वत्र त्याचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. पंचमहाभूतांनी आता प्रकोप दाखवण्यास सुरुवात केली आहे. ‘पृथ्वीचा विनाश जवळ आलाय का?’ असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मात्र, खरी गोष्ट अशी आहे की, पृथ्वीचा विनाश जवळ आलेला नसून, त्या विनाशाला आता सुरुवात झाली आहे.
पृथ्वीचा विनाश म्हणजे एखादा मोठा स्फोट, भूकंप किंवा सजीवसृष्टीचा एकदम नाश, असे काही एकाचवेळी होणार नाही. पण सध्या या सर्व गोष्टी कमी-अधिक प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी घडताना दिसत आहेत. पंजाब, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड येथील ताजी परिस्थितीचा अभ्यास केला तर लक्षात येईल की, विनाश सुरू झालेला आहे.
अनियमित पाऊस, अती उष्णता, अती थंडी या सर्व गोष्टींचा अनुभव आपण घेत आहोत. प्रत्येक ऋतुमानात माणूस माकडाच्या गोष्टीप्रमाणे वागतो. एका गोष्टीत पावसाळा आल्यानंतर माकड घर बांधायला लागते त्याच माकडासारखेच आज माणसाचे वर्तन दिसते. गेल्या अनेक वर्षांच्या चुकांच्या डोंगरामुळे पृथ्वीचा तोल ढासळू लागला आहे.
कधी उष्माघात, कधी कडाक्याची थंडी, तर कधी अतिवृष्टी या साऱ्याचा सामना आपल्याला करावा लागत आहे. हिमालयाच्या शिखरापासून समुद्राच्या तळापर्यंत – हजारो किलोमीटर परिघात मानवी अतिहस्तक्षेप आणि चुकीच्या सवयींमुळे हिमालय व समुद्रात मोठे बदल घडू लागले आहेत. समुद्राने अती उग्र स्वरूप धारण केले आहे, तर हिमालय वितळू लागला आहे. त्यामुळे नद्या आणि समुद्राची पातळी वाढू लागली आहे. हिमालय अशाच वेगाने वितळत राहिला तर भविष्यात अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. या भयंकर परिणामांना रोखण्यासाठी आजच जागं होणं आवश्यक आहे. याकरता जल, जमीन आणि वायू प्रदूषण टाळणं अत्यावश्यक आहे. वायू प्रदूषणामुळे ओझोनवर परिणाम होऊन वातावरण तापू लागले आहे. यामुळे श्वसनाचे रोगही बळावत आहेत. मानवी आणि निसर्गाच्या आरोग्यावरही याचे गंभीर परिणाम होत आहेत.
औद्योगिक क्रांतीपासून मानवी क्रियाकलापांमुळे जागतिक तापमान वाढले आहे आणि परिणामी हवामान बदलाचे दुष्परिणाम जगभर अनुभवले जात आहेत. हवामान गरम होत आहे याचा सर्वात नाट्यमय पुरावा म्हणजे पर्वतीय हिमनद्यांचे लोप होणे. शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे की, अंटार्क्टिका आणि आशियातील हिमनद्या वाढत्या तापमानामुळे सर्वाधिक प्रभावित झाल्या आहेत. दरवर्षी बर्फ पुन्हा भरण्यासाठी हिमनद्या मुसळधार पावसावर अवलंबून असतात. मात्र, पावसाळा विस्कळीत झाल्यास बर्फाची पातळी घटते. परिणामी हिमनद्या वितळतात, नद्यांना पूर येतो, पिके, पशुधन व लोकसंख्या यांना धोका निर्माण होतो. जलविद्युत प्रकल्पही विस्कळीत होतात.
कोकण किनारपट्टीवरचे परिणाम
कोकण प्रदेशातील रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केल्यास, मिऱ्या बंदरापासून हर्णे, आंजर्ले, मुरुड, केळशी (दापोली तालुका) पर्यंतच्या किनारपट्टीचा भूभाग हा समुद्राची पाणी पातळी वाढल्यामुळे कमी झाल्याचे स्पष्ट दिसते. दाभोळ खाडीमध्ये गेल्या ३५ वर्षांमध्ये वाळूची टेकडी निर्माण झाल्याने वाशिष्ठी बॅकवॉटरला अडथळा निर्माण झाला आहे. तसेच चिपळूणसारख्या शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण होत आहे. समुद्र, खाडी, नदी हे जलस्रोत दूषित होणे, गाळ साचणे या गोष्टी याआधी भ्रामक कल्पना वाटत होत्या. परंतु अशिक्षितपणा आणि बेपर्वाईमुळे सर्व जलस्रोतांना विसर्जन घाट समजून कचरा डंपिंग करणे हे प्रकार वाढले आहेत. हे तात्काळ आणि पूर्णतः थांबवणे आवश्यक आहे.
(लेखक पर्यावरणाच्या शाश्वत विकास विषयातील तज्ज्ञ आहेत.)