rat14p8.jpg, rat14p9.jpg-
91404, 91405
सावर्डेः डेरवण येथील ड्रीम हेल्थ पार्कमध्ये मांडलेल्या प्रतिकृती.
‘ड्रीम हेल्थ पार्क’ पाहिले १५ हजार विद्यार्थ्यांनी
डेरवण येथे प्रतिकृती : आरोग्यासह भूगोल, इतिहासाचीही माहिती
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १४ : डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाने ‘ड्रीम हेल्थ’ संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. याचे उद्घाटन सहा वर्षांपूर्वी पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि डॉ. टी. रामासामी (पद्मविभूषण) यांच्या हस्ते झाले होते. आतापर्यंत १५ हजार विद्यार्थ्यांनी या ड्रीम हेल्थ पार्कला भेट देऊन आरोग्यविषयक संकल्पना जाणून घेतल्या आहेत.
डेरवण येथील हे संग्रहालय प्रशस्त असून १६०० चौरस मीटर जागेत उभारले आहे. १० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना हसत-खेळत त्याचा आनंद घेता यावा आणि योग्य ती माहिती मिळावी, असा त्याचा उद्देश आहे. बालपणात झालेले संस्कार, सवयी या कायमस्वरूपी मनावर कोरल्या जातात, हे लक्षात घेऊन या पार्कमध्ये आहार, विहार, आचार, शारीरिक सवयी, मानसिक आरोग्य यावर भर देऊन खेळातून प्रबोधन केले आहे. या हेल्थ पार्कमध्ये प्रवेश करतानाच विद्यार्थी स्वतःचे वजन आणि उंची मोजू शकतो. अतिस्थूल मुलांनी कोणता आहार टाळावा, इथपासून योग्य आहार काय याचीही माहिती या ठिकाणी दिली जाते. रक्तक्षय कसा ओळखावा, त्यासाठी आहारात कोणत्या फळे आणि भाज्यांचा समावेश असावा, ही माहिती तिथे दिली जाते. लहान मुलांना होणारा मानसिक ताण ओळखण्यासाठी काही खेळही तिथे आहेत.
तरुणांसाठी लैंगिक शिक्षण, मासिक पाळी, गर्भनिरोधक औषधांचे प्रकार समजावणारी अनेक मॉडेल्स आहेत. अनवाणी चालणे, वृक्षारोपण आणि त्यामुळे मिळणारा प्राणवायू, आणि तिथे असलेल्या सेल्फी पॉईंटवर फोटो काढून बागेतील खेळाचा आनंद मुलांना घेता येतो. भारतीय संस्कृती व प्रत्येक सणाला तयार केलेले पदार्थ आणि त्यामधून मिळणारे घटक यांचे ज्ञान मुलांना दिले जाते. देशप्रेम वाढावे आणि भूगोल आणि इतिहासाबाबत योग्य माहिती मिळावी यासाठी काही मॉडेल्स तिथे ठेवलेली आहेत. आजपर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पाटण, सातारा, कराड, मुंबई, पुणे, ठाणे अशा अनेक भागातून जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांनी या पार्कला भेटी दिल्या आहेत.
कोट
हेल्थ पार्क संकल्पनेतून विद्यार्थ्यांचे प्रबोधन हा नवा विचार घेऊन वालावलकर रुग्णालय, पुढे होणाऱ्या आजारांवर प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करत आहे.
- डॉ. सुवर्णा पाटील, संचालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.