-rat१४p३३.jpg-
२५N९१५१७
रत्नागिरी : शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रात क्षेत्र अभ्यास करणारे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी.
आधुनिक उपकरणांपासून कोकणातील शेतकरी दूर
माती परीक्षणासह यांत्रिकीकरणाचा अभाव, गोगटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सर्वेक्षण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : सत्तर टक्के शेतकरी माती परीक्षण टाळतात. शेतजमीन सलग नसल्याने मोठी उपकरणे वापरणे सोयीचे नाही. त्यामुळे केवळ १८ टक्के शेतकरी हे शेतीकरिता आधुनिक उपकरणाचा विचार करतात. भातशेती जमीनक्षेत्र अधिक आहे, मात्र सरासरी उत्पादन कमी आहे. पारंपरिक पद्धतीने उत्पादन असल्याने ५०० ते १२००० किलोपर्यंत उत्पादन होते. शेतीमधून लाखो रुपये मिळू शकतात, असे दिसून येईल त्यावेळेस शेतकरी व युवक व्यवसाय म्हणून याकडे वळतील. केवळ आंबा, काजू पुरती ओळख फार काळ उपयोगाची ठरणार नाही, असा निष्कर्ष गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विषयातील व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणातून काढला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत नव्या शैक्षणिक आराखड्याला स्वीकारण्यात आले. विविध सामाजिक घटकांचा अभ्यास विद्यार्थिदशेत करण्याकरिता क्षेत्र प्रकल्प अभ्यास रचना करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण केले. शिरगाव कृषी संशोधन केंद्रास भेट दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भात उत्पादक ८३ शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. त्यातून शेती क्षेत्र, लागवड पद्धती, उत्पादन, शासकीय योजना, माती परीक्षण अशा विविध विषयाची माहिती संकलित केली.
माती परीक्षण, उत्पादन, शासकीय योजना, प्रक्रिया उद्योग, प्रशिक्षण या आणि अशा अनेक घटकांची माहिती व मदत शेतकऱ्यांना होणे आवश्यक आहे. स्थानिक अभ्यास भातशेती उत्पादक शेतकऱ्यांच्या अभ्यासातून व क्षेत्र अभ्यासातून अनेक प्रश्न सोडविता येणे शक्य आहे, असे मत सर्वेक्षण करणाऱ्या गटातील कुणाल खेत्री या विद्यार्थ्याने मांडले. भात कापणी पश्चात पुन्हा सर्वेक्षण केले जाणार आहे, असे डॉ. तुळशीदास रोकडे यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
चौकट १
सर्वेक्षणातील काही निरीक्षणे
भात उत्पादन हे घरगुती वापरासाठी केले जाते. फार कमी ठिकाणी पोहे उत्पादन करण्यासाठी भाताचे उत्पादन केले जाते. तांदळापासून विविध पदार्थ होत असले तरी केवळ भात खाण्यासाठी अधिक उपयोग शेतकऱ्याकडून केला जातो. ३५ टक्के भाताचा वापर हा अन्य पदार्थांसाठी केला जातो. प्रक्रिया उद्योगांची कमतरता आहे. शासनाने नमो शेतकरी सहाय्यता निधी वितरण केले, विविध सबसिडी, पीक विमा, अनुदान, कर्ज सवलत, यातून शेतकरी स्वावलंबी व अधिक आर्थिक सक्षम बनविण्याचे प्रयत्न केले जात असले तरी त्याचा लाभ न मिळणारे शेतकरी अधिक असल्याचे दिसून येते.
कोट १
कोकणातील स्थानिक शेतकरी भातशेती करतो, त्याकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे. पोहे, लाह्या, पीठ, खाण्यासाठी व भाकरीसाठी व विविध उत्पादनांसाठी भात शेती मदत करू शकेल. शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे व शेती अध्ययन अधिक व्यापक झाले पाहिजे.
-डॉ. नीलेश सोनोने, कृषी पर्यवेक्षक.
कोट २
शेती तसेच स्थानिक भात शेती उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वेक्षणातून स्थानिक शेतकऱ्यांचे अध्ययन करण्यात आले. होणारे स्थानिक युवकांचे स्थलांतर व त्यातून निर्माण होणारे प्रश्न तसेच, रोजगाराचे नवीन मार्ग निर्मिती करण्यासाठी स्थानिक शेती अधिक सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे.
- प्रा. सचिन सनगरे.