चिपळूण उपजिल्हा रुग्णालयात
उद्या मोफत आरोग्य शिबिर
चिपळूण : भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १७ सप्टेंबरला सकाळी १० ते ५ या वेळेत सुरू राहणार आहे.
आरोग्य शिबिरामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध असणार आहेत. शिबिरात स्त्रीरोग, हृदय रोग, मधुमेह, त्वचारोग, मानसिक आजार, मूत्रपिंडाचे आजार, अस्थिरोग, हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स, मिरगी (फिट), गुप्तरोग, एचआयव्ही/एड्स, नेत्र आणि गर्भाशयाचे आजार यासह बालरोगांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.
याशिवाय दंत तपासणी, मौखिक आरोग्य तपासणी व उपचार, रक्त व लघवी तपासणी, शुगर, ईसीजी इत्यादी तपासणी, सोनोग्राफी तपासणी, स्तन व गर्भाशयाचे कॅन्सर तपासणी, क्ष-किरण, सीटी स्कॅन तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहेत.