91637
‘शब्दांच्या पलीकडले’ अभिजाततेचे प्रतीक
रामचंद्र आंगणे ः आचरा क्र. १ केंद्रशाळेत पुस्तक प्रकाशन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १५ ः ‘‘सुरेश ठाकूर यांचे ‘शब्दांच्या पलीकडले’ हे पुस्तक मराठी भाषेच्या अभिजाततेचा मागोवा घेणारे ठरणार आहे. भाषा जेव्हा अभिजात होते, तेव्हा अनेक भाषा, विविध संस्कृतींमधून वेगवेगळे शब्द आपल्या भाषेत येत असतात. अशा निवडक १११ शब्दांच्या कूळकथा आणि मूळकथा ठाकूर यांनी या पुस्तकात चितारल्या आहेत. प्रत्येक विद्यामंदिरातील संदर्भ पुस्तकांच्या कपाटात ‘शब्दांच्या पलीकडले’ हे संदर्भ पुस्तक प्रमुख स्थान पटकावणार, हे निश्चित,’’ असे गौरवोद्गार उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) रामचंद्र आंगणे यांनी प्रकाशन सोहळ्याप्रसंगी काढले. प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या ‘शब्दांच्या पलीकडले’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच बा. ना. बिडये विद्यामंदिर केंद्रशाळा, आचरे क्र. १ येथे आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरचे अध्यक्ष बाबाजी तथा तात्या भिसळे होते. व्यासपीठावर आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, ज्येष्ठ मालवणी कवी रुजारियो पिंटो, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशीचे अध्यक्ष अशोक कांबळी, डॉ. विनायक करंदीकर, द. शि. हिर्लेकर, नवीन शैक्षणिक धोरण सुकाणू समितीचे सदस्य भरत गावडे, साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आणि कवी विठ्ठल कदम, म. ल. देसाई, सुरेंद्र सकपाळ, सुगंधा गुरव, रामचंद्र कुबल, पांडुरंग कोचरेकर, अनिरुद्ध आचरेकर, गुरुनाथ ताह्मणकर आदी उपस्थित होते.
यावेळी ठाकूर यांनी ‘शब्दांच्या पलीकडले’ हे पुस्तक रामेश्वर वाचन मंदिराला अर्पण केले. ‘‘रामेश्वर वाचनालयाने बालपणापासूनच सकस आणि चोखंदळ वाचनाचे वेड लावले. आजचे संदर्भ पुस्तक हे त्याचाच एक परिपाक आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
‘‘वाचनालयाचा प्रतिनिधी म्हणून मी हे पुस्तक स्वीकारत आहे,’’ असे गौरवोद्गार अध्यक्ष भिसळे यांनी काढले. हिर्लेकर गुरुजी, डॉ. करंदीकर, सरपंच फर्नांडिस, कांबळी, कवी रुजारियो पिंटो, सांबारी यांनी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ कवी प्रमोद जोशी यांच्या कवितारुपी शुभेच्छा, ‘कोमसाप’ सल्लागार सदानंद कांबळी, कवी गिरीधर पुजारे यांच्या साहित्यिक शुभेच्छांचे वाचन रामचंद्र कुबल यांनी केले.
सुरेंद्र सकपाळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. अनघा कदम यांनी पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या आशीर्वादाचे पत्र वाचून दाखवले. मधुरा माणगावकर यांनी ‘मनातले दोन शब्द’ हा पुस्तकातील भाग वाचून दाखवला. रश्मी आंगणे यांनी प्रार्थनागीत सादर केले. यावेळी नितीन वाळके, चारुशीला देऊलकर, प्रकाश पेडणेकर, लक्ष्मणराव आचरेकर, स्मिता बर्डे, प्रमोद कोयंडे, रामचंद्र वालावलकर, सुरेश गावकर, कल्पना मलये, विजय चौकेकर आदी उपस्थित होते. रामचंद्र कुबल यांनी सूत्रसंचलन केले. गुरुनाथ ताह्मणकर यांनी प्रास्ताविक केले. सुगंधा गुरव यांनी आभार मानले.
.....................
‘मराठीचे कूळ व मूळ धुंडाळण्याचा प्रयत्न’
‘कोमसाप’चे संस्थापक, ज्येष्ठ लेखक मधू मंगेश कर्णिक यांनी खास पत्ररुपी संदेश लिहून आपल्या मौलिक शुभेच्छा दिल्या. सुरेश ठाकूर यांनी गेली अनेक वर्षे ‘कोमसाप’च्या माध्यमातून कोकणातील उमलत्या आणि उमललेल्या लेखकांना हक्काची प्रकाशखिडकी उपलब्ध करून दिली आहे. या पुस्तकात त्यांनी मराठी शब्दांचे कूळ आणि मूळ धुंडाळण्याचा जो व्यासंगी प्रयत्न केला आहे, त्याचे कौतुक करावे असे वाटते, असे त्यांनी म्हटले आहे. पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे प्रकाशन आचरे सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले.