91657
पिंगुळी ‘महापुरुष’ भजन मंडळ प्रथम
मुणगेतील स्पर्धा; भगवती देवस्थानतर्फे बक्षीस वितरण
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. १५ ः येथील देवी भगवती देवस्थान सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित निमंत्रित भजन मंडळांच्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेमध्ये महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळीचे (ता. कुडाळ) बुवा प्रसाद आमडोसकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक श्री रामकृष्ण हरी भजन सेवा संघ पाट-पंचक्रोशीचे बुवा आशिष सडेकर यांनी, तृतीय क्रमांक श्री जैतीर कृपा प्रासादिक भजन मंडळ कुडाळचे बुवा सिद्धेश नाईक यांनी मिळविला. या स्पर्धेसाठी मुणगे ग्रामस्थांसह आचरा, पोयरे, हिंदळे, मिठबाव, दहिबाव आदी पंचक्रोशीतील भजन रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुणगे येथील प्रसिद्ध देवस्थान देवी भगवती मंदिरामध्ये एकवीस दिवसांच्या गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी (ता. १४) सत्यनारायण महापूजेनिमित्त जिल्ह्यातील नामांकित भजन मंडळांच्या सहभागातून जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विजेत्या संघांना देवस्थानचे अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर आदींच्या हस्ते रोख रक्कम, प्रशस्तिपत्र, आकर्षक चषक, देवीची प्रतिमा व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेत सात निमंत्रित भजनी बुवांनी सहभाग घेतला. यामध्ये उत्कृष्ट गायक जयेश घाडी (श्री गांगोरामेश्वर भजन मंडळ), उत्कृष्ट कोरस श्री काळंबादेवी प्रासादिक भजन मंडळ कुणकेश्वर (ता. देवगड), उत्कृष्ट पखवाजवादक प्रथमेश राणे (महापुरुष प्रासादिक भजन मंडळ) यांची निवड करण्यात आली. त्यांना चषक, प्रशस्तिपत्र, गुलाबपुष्प देऊन विश्वस्तांच्या हस्ते सन्मानित केले. उत्तेजनार्थ श्री चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ सुरंगपाणी (ता. वेंगुर्ले, अनिकेत भगत), श्री गांगोरामेश्वर प्रासादिक भजन मंडळ पोयरे (ता. देवगड, जयेश घाडी), श्री विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ राठिवडे (ता. मालवण, अक्षय परुळेकर) व श्री काळंबादेवी प्रासादिक भजन मंडळ कुणकेश्वर (ता. देवगड, अतुल मेस्त्री) यांना सन्मानित केले.
संगीत अलंकार बुवा रुपेंद्र परब व पखवाज विशारद आनंद मोर्ये यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर विश्वस्त प्रकाश सावंत, कृष्णा ऊर्फ दादा सावंत, पुरुषोत्तम तेली, वसंत शेट्ये, मनोहर मुणगेकर, रामचंद्र मुणगेकर, आनंद घाडी, वसंत शेट्ये, भगवती एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक व भजनी बुवा देवदत्त ऊर्फ आबा पुजारे, शंकर मुणगेकर, शैलेश सावंत, वैभव शेट्ये, चंद्रकांत रासम, विष्णू मुणगेकर, गोविंद सावंत, रामतीर्थ कारेकर आदी उपस्थित होते. देवदत्त ऊर्फ आबा पुजारे यांनी आभार मानले.