‘फार्मर आयडी’बाबत
शेतकऱ्यांना आवाहन
दोडामार्ग : तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याने आपला फॉर्मवर आयडी अर्थात अॅग्रीस्टॅक काढावा, असे आवाहन तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे. अॅग्रीस्टॅकमुळे शेतकऱ्यांना एक युनिक फार्मर आयडी मिळतो, ज्यामुळे विविध सरकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. तसेच पीक कर्ज, विमा, खते आणि बियाणे घेण्यासाठी सोपे होणार आहे. ही योजना शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करते आणि त्यांना डिजिटल स्वरुपात ओळख देते. त्यामुळे योजनेचा लाभ मिळविणे सुलभ होते. शेतकऱ्यांनी फार्मर आयडीकरिता आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, सातबारा उतारा किंवा आठ-अ उतारा, आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल याबाबत पूर्तता करून महा-ई सेवा केंद्र, सेतू कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, ग्राम महसूल अधिकारी कार्यालय येथे नोंदणी करावी, असे आवाहन तहसीलदार प्रज्ञा राजमाने, तालुका कृषी अधिकारी सौरभ कदम यांनी केले आहे.
....................
‘वन्यप्राण्यांचा
बंदोबस्त करा’
दोडामार्ग : जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार जंगली प्राण्यांमुळे हतबल झाले आहेत. माकडांमुळे केळी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पपई, चिकू व अन्य फळझाडे नष्ट होत आहेत. शेतकऱ्यांनी मेहनत करावयाची व जंगली प्राण्यांनी नष्ट करायचे असेच प्रकार सध्या सुरू आहेत. त्यामुळे जंगली प्राण्यांपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे, अशी मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विजयकुमार मराठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, माकड़ व शेकरू नागरिकांचे अतोनात नुकसान करीत आहेत. गवा रेडा व हत्तीमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. भातशेती, नाचणी व अन्य लागवड बंद होण्याच्या स्थितीत आहे. इथल्या भूमिपुत्राने जगायचे की स्थलांतर करायचे, हा प्रश्न आहे. काही भूमिपुत्र जमिनी विकत आहेत. कोकण वाचविण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत. प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मराठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
---
प्रक्रिया उद्योगासाठी
शासनाकडून अनुदान
दोडामार्ग : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योगासाठी बँक कर्जावर ३५ टक्के ते जास्तीत जास्त १० लाखपर्यंत अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतमालावर प्रक्रिया करून शेतमालाचे मूल्यवर्धन करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सौरभ कदम यांनी केले आहे. बँक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे पॅन कार्ड, आधार कार्ड, लाइट बिल, बँक स्टेटमेंट, मशिनरी कोटेशन, शैक्षणिक कागदपत्रे यांची आवश्यकता आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषि अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी दोडामार्ग यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.