माजगाव नवरात्रोत्सव
अध्यक्षपदी राठवड
ओटवणे ः माजगाव नाला सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी माजगाव माजी सरपंच मंगेश राठवड, उपाध्यक्षपदी रोशन तळवडेकर, राजू कुबल, सचिवपदी रूपेश नाटेकर, सहसचिवपदी राजेश हरमलकर, तर खजिनदारपदी एलियास राजगुरू यांची निवड झाली. माजगाव नाला सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या शनिवारी (ता. १३) झालेल्या नियोजन बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीत या सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या सदस्यपदी दिनेश सावंत, सुनील सागवेकर, बंटी कासार, संजय माजगावकर, प्रशांत बुराण, सचिन कासार, वैभव मोर्ये, सचिन मोरजकर, शुभम कुबल, रणवीर सूर्यवंशी, राजन पाटकर, संजू बोंद्रे, अशोक पाटकर यांची निवड करण्यात आली. नवरात्रोत्सवानिमित्त २२ सप्टेंबरपासून दररोज सायंकाळी भजन, दशावतार नाट्यमंडळाचे नाटक, जादूचे प्रयोग आदी कार्यक्रम, पपेट शो, स्थानिक मुलांचे कार्यक्रम, महिलांची फुगडी तसेच डबलबारी आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले. उत्सवाच्या दहाव्या दिवशी १ ऑक्टोबरला सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत.
.....................
मळगाव घाटीतील
‘ते’ झाड हटविले
सावंतवाडी ः मळगाव घाटीत रस्त्यालगत असलेले आंब्याचे जीर्ण झाड वन विभागाने हटविले. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या घाटीतील रस्त्यावरून सतत वाहनांची वर्दळ असते. डोंगराळ भागातून जाणाऱ्या या रस्त्यालगत असलेली काही झाडे धोकादायक स्थितीत उभी आहेत. ती झाडे रस्त्यावर पडून अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे वन विभागाने धोकादायक झाडांचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार धोकादायक झाडे टप्प्याटप्प्याने हटवण्याचे काम हाती घेतले आहे. मळगाव घाट रस्त्यालगत असलेले धोकादायक आंब्याचे जीर्ण झाड केव्हाही रस्त्यावर पडून अपघात होण्याची शक्यता होती. सतत पडणाऱ्या पावसामुळे आंब्याचे जीर्ण झाड अधिकच धोकादायक बनले होते. प्रवाशांसाठी धोकादायक बनलेले हे जीर्ण झाड तातडीने हटवून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत होती. याची वन विभागाने दखल घेत सोमवारी (ता. १५) हे धोकादायक झाड हटवले. त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
---
साहित्य कट्ट्याचा
रविवारी कार्यक्रम
सावंतवाडी ः आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सलग एकोणसाठावा मासिक कार्यक्रम रविवारी (ता. २१) सायंकाळी ४.३० वाजता शिरोडा येथील सचिन गावडे यांच्या घरी आयोजित करण्यात आला आहे. पुस्तक चर्चेसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सचिन गावडे, प्रा. नीलम कांबळे आणि डॉ. गणेश मर्ढेकर हे सदस्य अनुक्रमे लस्ट फॉर लालबाग (विश्वास पाटील), झपाटलेले सहजीवन (भारत व प्राची पाटणकर) आणि पहिले प्रेम (वि. स. खांडेकर) अशा त्यांना भावलेल्या पुस्तकांविषयी विवेचन करतील. त्यानंतर त्यावर चर्चा होईल. या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले आहे.
--------
मालवण येथे शुक्रवारी
चॅपेल उद्घाटन सोहळा
मालवण ः मालवण-गवंडीवाडा बाजारपेठेतील सेंट पीटर चॅपेलच्या नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (ता. १९) दुपारी ४ वाजता सिंधुदुर्गचे बिशप अल्विन बॅरेटो यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.