वाहन कोंडीच्या नियोजनाबाबत
कडावलमध्ये पोलिसांचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ः गणेशोत्सव काळात कडावल बाजारपेठेतील वाहतूक कोंडी प्रश्न पोलिसांनी उत्तमरित्या हाताळल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. याबाबत पोलिस प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे.
गणेश चतुर्थी उत्सव कालावधीत मुंबई, पुणे व अन्य शहरांतील चाकरमानी मोठ्या संख्येने रेल्वे, आराम बस, एसटी बसेसने तर काही जण आपली खासगी वाहने घेऊन गावांत दाखल होतात. कडावल ही प्रमुख बाजारपेठ असून पांग्रड, भडगाव, वर्दे, आवळेगाव डिगस, किनळोस, निरुखे या गावांतील ग्रामस्थांसाठी मध्यवर्ती व सोयी सुविधांनी उपलब्धता असलेली बाजारपेठ आहे. त्यामुळे या बाजारपेठेत वारंवार वाहनांची कोंडी होते. अशावेळी पोलिस उपस्थित नसल्यास समस्या गंभीर बनते आणि चालकांमध्ये वाद होतात. याचे गांभीर्य लक्षात घेऊन कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली या कालावधीत पोलिसांनी योग्य ती दक्षता घेतली.
आवळेगाव दूरक्षेत्राचे प्रमुख अनंत तिवरेकर यांच्यासह समीर कोचरेकर, नंदकिशोर नेरकर, होमगार्ड तन्मय निरुखेकर, दीपक परब यांनी वाहनधारकांवर करडी नजर ठेवून नियमबद्ध काम केले. गणपती विसर्जनासाठी रात्री नऊपर्यंत बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जाणवली नाही. आवळेगाव पोलिसांनी बाजारादिवशी अशी व्यवस्था ठेवावी, अशीही मागणी होत आहे.