- rat16p7.jpg -
25N91828
रश्मी विचारे
नर्मदा परिक्रमेवर आज व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः तीनवेळा पायी नर्मदा परिक्रमा करणाऱ्या रश्मी विचारे यांचे चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयात ‘नर्मदा परिक्रमा –आत्मज्ञान आणि आत्मविश्वास’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. माजी विद्यार्थी संघाच्यावतीने उद्या (ता. १७) सकाळी १० वाजता हे व्याख्यान होणार आहे.
मुंबईस्थित असलेल्या व गुहागर तालुक्यातील अडूर गावच्या सासुरवाशीण असलेल्या विचारे यांनी तीनवेळा नर्मदा परिक्रमा पायी केली आहे. तसेच गेल्या वर्षी यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ ही चारधाम पायीवारीची स्वप्नपूर्ती पूर्ण केली. सांसारिक सुख, सोयीसुविधांचा त्याग करून व संन्यासिनी व्रत धारण करून चार महिने नर्मदा नदीकिनारी चालत ३६०० कि.मी.ची नर्मदा परिक्रमा ही यात्रा पूर्ण करण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे. परिक्रमेत भेटलेले परिक्रमावासिय, आश्रमवासिय, स्नेह-प्रेम-काळजी-आदरभाव-उदारता या मनाच्या श्रीमंतीने काठोकाठ भरलेले नर्मदेच्या काठावरील सेवाभावी लोक, अडचणीच्यावेळी कोणाच्याही रूपात दर्शन देणारी नर्मदामैया अशा अनेक अनुभव व आठवणी गाठीशी बांधून विचारे यांनी ही परिक्रमा पूर्ण केली. त्यांच्या या धाडसी परिक्रमेबद्दल मुलुंड मराठा मंडळ, चित्पावन ब्राह्मण संघ मुलुंड यांच्यातर्फे सत्कार व प्रकट मुलाखत घेण्यात आली होती. त्यांच्या परिक्रमेतील ''आत्मज्ञान व आत्मविश्वास'' आजच्या पिढीच्या समोर यावे, ''नर्मदा परिक्रमा'' म्हणजे काय? या सर्व मुद्द्यांना परिस्पर्श लाभावा, यासाठी मार्गताम्हाणे महाविद्यालय माजी विद्यार्थीसंघाने विचारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे.