‘सीएससी’ केंद्रामधून
माफक दरात सेवा
सिंधुदुर्गनगरीः अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना आता सीएससी केंद्रामधून महामंडळाच्या योजनांचा लाभ माफक दरात घेता येणार आहे. याबाबतचा सामंजस्य करार महामंडळाच्या मुख्य कार्यालयामध्ये महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख व सीएससी केंद्राचे प्रमुख वैभव देशपांडे यांच्या उपस्थितीत केला असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. मुंबईचे उपमहाव्यवस्थापक आकाश मोरे यांनी दिली. या करारानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे लाभार्थी आता त्यांच्या जवळच्या कोणत्याही सीएससी केंद्रावर जाऊन महामंडळाच्या योजनांचा लाभ कमी दरात घेऊ शकतील. यामध्ये महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, योजनेची सद्यस्थिती तपासणे आणि आवश्यक मार्गदर्शन मिळवणे यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. या नवीन उपक्रमामुळे महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि किफायतशीर होईल, असे मत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी व्यक्त केले.
..................
‘रब्बी’ प्रात्यक्षिकांसाठी
अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरीः रब्बी हंगामासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अणि पोषण अभियान अंतर्गत भात क्षेत्रामध्ये कडधान्य उत्पादन वाढविण्यासाठी २०२५-२६ पिकांतर्गत पीक प्रात्यक्षिके या घटकांसाठी शेतकरी गटांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत भात क्षेत्रामध्ये कडधान्य उत्पादन वाढविण्यासाठी ‘हरभरा’ या पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश ठेवून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पीक प्रात्यक्षिकासाठी कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे ३१ मार्चपूर्वी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी अर्ज करावे. गटाने प्राधिकृत सदस्यामार्फत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. पीक प्रात्यक्षिके या घटकाअंतर्गत शेतकरी गटांना अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत केली आहे.
......................
बांधकाम विभागाची
उद्या मासिक सभा
सिंधुदुर्गनगरीः जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग समितीची मासिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. १८) सकाळी १०.३० वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित केली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता समितीचे सचिव राजेंद्र सावंत यांनी दिली.