घरगुती वीजग्राहकांना ‘टीओडी’चा फायदा
महावितरणकडून दोन महिन्यात १९ लाखांची सवलत ; स्मार्ट मीटरमुळे स्वस्त वीज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : महावितरणने घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (टाईम ऑफ डे) मीटर देण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरात घरगुती ग्राहकांना दररोजच्या वीजवापरात प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत जाहीर केली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ७३७ वीजग्राहकांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात १९ लाख ६६ हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत. घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा १ जुलैपासून सुरू झाला आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.
स्मार्ट टीओडी मीटरमुळे जुलै महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातील ४८ हजार ४८१ ग्राहकांना ३ लाख २० हजारांची तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ हजार १२५ ग्राहकांना ६७ हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यात वीजग्राहकांची मिळालेली सवलत वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ९१ हजार ३५९ ग्राहकांना ११ लाख ८१ हजारांची तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ हजार ७७२ ग्राहकांना ३ लाख ९७ हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. दोन्ही महिन्यांचा एकत्रित विचार करता रत्नागिरी जिल्ह्यातील १ लाख ३९ हजार ८४० ग्राहकांना १५ लाख १ हजाराची तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३ हजार ८९७ ग्राहकांना ४ लाख ६५ हजार रुपयांची सवलत मिळाली आहे.
नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरमधून स्वयंचलित मासिक रीडिंग होत असल्याने अचूक बिले मिळतात आणि घरातील विजेचा वापर दर अर्ध्या तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येतो. त्यामुळे वीजवापरावर देखील ग्राहकांचे थेट नियंत्रण राहत आहे. सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंगमशिन, गिझर, इस्त्री, एअर कंडिशनर व जास्त वीजवापर असणाऱ्या इतर उपकरणांचा वापर करू शकतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे. टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीजवापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिक ग्राहकानंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीजदरासाठी टीओडीप्रमाणे आकारणी सुरू झाली आहे.
चौकट
...असा मिळणार आहे फायदा
२०२५ ते ३० या पाच वर्षासाठी आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी टाईम ऑफ डे (टीओडी) नुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत मंजूर केली आहे. यात १ जुलै २०२५ ते मार्च २०२६ मध्ये ८० पैसे, २०२७ मध्ये ८५, २०२८ व २९ मध्ये ९० पैसे तसेच २०३० मध्ये १ रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसवणे आवश्यक आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.