rat17p4.jpg-
92081
चिपळूण ः टेरव येथील श्री भवानी वाघजाई.
नवरात्रोत्सवासाठी टेरवच्या वाघजाई मंदिरात तयारी
विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन; २२ रोजी प्रतिष्ठापना
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ ः तालुक्यातील टेरव येथील मंदिरात कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई मातेचा नवरात्रोत्सव २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवात श्री भवानी, वाघजाई, महालक्ष्मी, कालकाई व कुलस्वामिनी या देवींना वारानुसार नवरंगाच्या साड्या परिधान करून सोन्या-चांदीच्या मौल्यवान अलंकारांनी सालंकृत करण्यात येणार आहे. तसेच मंदिरास रोषणाई, आकर्षक फुलांची सजावट करून पालखीत रुपे लावण्यात येणार आहेत.
मंदिरात भवानीमातेच्या ७.५ फूट उंचीच्या अत्यंत सुंदर व कृष्णशीला मूर्तीसह गणपती, वाघजाई, भूमिगत कालकाई, महालक्ष्मी, कुलस्वामिनी, महादेवाची पिंडी, भैरी, केदार, तसेच नवदुर्गा आदी देवतांची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराचे खास आकर्षण म्हणजे श्री भवानीमातेसमवेत शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या नवदुर्गांच्या मूर्ती सविस्तर माहितीसह स्थापित केलेल्या आहेत. भैरी-भवानी आणि नवदुर्गा असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव देवस्थान आहे.
टेरव येथील भवानी-वाघजाई मातेच्या मंदिरासह चिपळूण येथील विंध्यवासिनी, परशुराम मंदिर, दसपटीची रामवरदायिनी, तुरंबव येथील शारदादेवी, तसेच मार्लेश्वर मंदिर आदी मंदिरांचे भक्तगण व पर्यटक दर्शन घेऊ शकतील. नवरात्रोत्सव कालावधीत मंदिर दर्शनासाठी सदैव खुले राहणार असून, ओटीचे सामान मंदिरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन टेरव ग्रामस्थांनी केले आहे.
चौकट
आध्यात्मिक केंद्रासह पर्यटनक्षेत्र
दाक्षिणात्य पद्धतीने बांधलेले हे कोकणातील मंदिर भाविक व पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. नागमोडी वळणाचा रस्ता, वनश्रीने नटलेले विस्तीर्ण पठार, तसेच गोपुरांचे भव्य-दिव्य मंदिर, आकर्षक मूर्ती, डोळ्यांचे पारणे फेडणारे सुंदर उद्यान, देवरहाटीतील हिरवीगार वनराई आणि गारवा यामुळे असंख्य भाविक व पर्यटक या देवस्थानाकडे आकर्षित होत आहेत. निसर्गसौंदर्य लाभलेले श्री क्षेत्र टेरव येथील हे देवस्थान धार्मिक, आध्यात्मिक केंद्रासह एक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत आहे.