rat17p2.jpg
92079
संगमेश्वरः येथील भातशेतामध्ये शेतकऱ्यांनी बुजगावणी उभी केली.
शेतकऱ्यांवर ‘जागते रहो’ ची वेळ
गवारेडा, रानडुक्कर व माकडांच्या त्रासाने भातशेतीसह इतर पिकांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १७ः कोकणातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत असला तरीही अद्यापही रानटी जनावरांच्या त्रासावर शेतकऱ्याला मात करता आलेली नाही. गवारेडे, माकडं, रानटी डुकरांसारख्या जनावरांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी जागते रहो..चा उपाय सुरू केला आहे.
कोकणात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. भातशेतीबरोबर नाचणी, वरी, कांग तसेच इतर शेतीही केली जाते. नदीकाठच्या भाताबरोबर डोंगरउतारावरही शेती केली जाते; मात्र शेती करताना रानटी जनावरांचा त्रास सहन करावा लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. माकड व वानरांचा त्रास सहन करावा लगत असताना गवारेडा व रानडुक्करांकडून अधिक त्रास होत आहे. रानडुक्करं शेतामध्ये येऊ नयेत यासाठी शेतकऱ्यांनी शेतामध्ये बुजगावणी उभी केलेली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात रानडुक्करांचा त्रास कमी झाला आहे. भातलोंबी वर येऊ लागली आहे. त्यामुळे वानरांचा व माकडांचा त्रास सहन करावा लागत आहे. वर्षभर मेहनत करून घेतलेले पीक वाया जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी जागते रहोचा नारा दिला आहे. काही ठिकाणी मचाण उभारून त्या ठिकाणी येणाऱ्या रानटी जनावरांचा बंदोबस्त करण्यात येत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी दरवर्षी वानर व गवारेड्यांचा त्रास कमी करण्यासाठी रात्री पहारा देत आपली शेती चांगली कशी राखता येईल, याकडे लक्ष दिले आहे.
चौकट
नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई
रानटी जनावरांकडून होत असलेल्या नुकसानीपोटी वनविभागाकडून नुकसान भरपाई दिली जाते; मात्र काही शेतकरी नुकसान झाले तरी नोंद करत नाहीत. त्यामुळे त्यांना भरपाई मिळत नाही तसेच काही शेतकरी क्षेत्र कमी असल्यामुळे नुकसानीची माहिती कळवत नाहीत. त्यासाठी या योजनांची जनजागृती करणेही गरजेचे आहे.