rat17p20.jpg
92192
रत्नागिरी : समृद्ध पंचायतराज अभियानअंतर्गत धामणसे ग्रामपंचायतीमध्ये आयोजित सभेचे उद्घाटन करताना सरपंच अमर रहाटे. सोबत उपसरपंच ऋतुजा कुळकर्णी व अन्य.
----------
शंभर टक्के घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट
अमर रहाटे ः धामणसे ग्रामपंचायतीत समृद्ध पंचायतराज अभियान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यात घरपट्टी १०० टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट धामणसे ग्रामपंचायतीने ठेवले आहे. गावकऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून धामणसे राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास सरपंच अमर रहाटे यांनी व्यक्त केला. त्यांच्या आवाहनाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
तालुक्यातील धामणसे ग्रामपंचायतीची ग्रामसभा डी. एम. जोशी सभागृहात बुधवारी २०० महिला व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाली. त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृष्टी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ग्रामसभेला मार्गदर्शन केले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या ७५व्या वाढदिवसाच्या औचित्याने महाराष्ट्र शासनाने समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पुढील शंभर दिवस ग्रामपंचायतींनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून लोकसहभागातून पंचायतराज व्यवस्था सक्षम व स्पर्धात्मक करावी.
सभेला उपसरपंच ऋतुजा कुळकर्णी, सदस्य अनंत जाधव, समीर सांबरे, संजय गोनबरे, दीपक रेवाळे, सिद्धी कानडे, वैष्णवी धनावडे, अनघा जाधव आदी उपस्थित होते. तसेच महसूल अधिकारी सिद्धी शिवलकर, माजी सरपंच विलास पांचाळ, आंबा व्यावसायिक प्रशांत रहाटे, श्री रत्नेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत देसाई, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दीपक जाधव आदी उपस्थित होते. केंद्रशाळा क्र. १ चे शिक्षक रसाळ व तायडे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.