swt1816.jpg
92391
सावंतवाडीः शहराच्या प्रवेशद्वारवर असलेली पर्यटन सुविधा केंद्राची इमारत.
swt1817.jpg
N92392
पर्यटन सुविधा केंद्राच्या छप्परामधून पावसाळ्यात पाणी पाझरत असल्याने आतील सामानाचे नुकसान झाले आहे.
swt1818.jpg
92393
पर्यटन सुविधा केंद्राच्या परिसरात वाढलेली झाडी.
पर्यटन केंद्र की जनावरांचा तळ?
प्रशासनाच्या अनास्थेमुळे सावंतवाडीतील प्रकल्प धुळखात; कोट्यवधी खर्चून केली होती उभारणी
रुपेश हिरापः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ः शहराच्या पर्यटन विकासासाठी आणि पर्यटकांना योग्य सुविधा देण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष तथा आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून कोट्यवधी खर्चून उभारलेले पर्यटन सुविधा केंद्र गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत पडून आहे. प्रशासनाच्या अनास्थेमुळे हा महत्त्वाचा प्रकल्प आज धुळखात पडला असून, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या केंद्राबाहेर मोकाट जनावरांनी आपला तळ ठोकला आहे. ही इमारत एकेकाळी सावंतवाडीच्या सौंदर्यात भर घालत होती. परंतु, आता हीच वास्तू शहराच्या दुर्लक्षित प्रकल्पांचे प्रतीक बनली आहे.
शहरातील या पर्यटन सुविधा केंद्राचा २२ वर्षापुर्वी प्रारंभ झाला. मोती तलावाच्या काठी, भोसले उद्यानाच्या बाजूला, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटात याचे उद्घाटन करण्यात आले. सावंतवाडी शहराच्या मुखावरच उभारलेल्या या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पर्यटकांना निवास, भोजन आणि स्थानिक पर्यटनस्थळांची माहिती देणे हा होता. तसेच, पर्यटकांना मार्गदर्शन (गाईड) मिळवून देणे आणि एकूणच सावंतवाडीतील पर्यटन वाढीला चालना देणे हे ध्येय समोर ठेवले होते. मात्र, उद्घाटनानंतरची काही वर्षे वगळता या प्रकल्पाचा मूळ हेतू कधीच साध्य झाला नाही. आजपर्यंत पर्यटन वाढीसाठी अपेक्षित असलेले प्रयत्न होताना दिसले नाहीत. स्थानिक नगरपालिका प्रशासनाची नकारात्मक मानसिकता आणि या प्रकल्पाकडे झालेले दुर्लक्ष हीच या प्रकल्पाच्या अधोगतीची प्रमुख कारणे ठरली आहेत.
पालिकेने आजवर शहराच्या हितासाठी आणि विकासासाठी जे जे प्रकल्प उभारले, त्यातील बहुतांश प्रकल्प सुरुवातीची काही वर्षे वगळता नंतर बंद पडल्याचे दिसून येते. सध्या सुरू असलेला शिल्पग्राम हा एकमेव प्रकल्प बराच काळ बंद होता, तो अलीकडेच पुन्हा कार्यान्वित झाला आहे. हेल्थ फार्म प्रकल्पही भाडेतत्त्वावर दिल्याने तो पुन्हा सुरू होण्याची आशा आहे. मात्र, रघुनाथ मार्केट आणि इतर अनेक प्रकल्प अजूनही बंद अवस्थेत आहेत. या मालिकेतीलच एक महत्त्वाचा दुवा म्हणजे पर्यटन सुविधा केंद्र. हा प्रकल्प अनेक वर्षे भाडेतत्त्वावर सुरू होता. पण,, कराराची मुदत संपल्यानंतर संबंधिताने भाडेकरार परवडत नसल्याचे हा प्रकल्प चालवण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे हा प्रकल्प गेले वर्षभर पूर्णपणे बंद आहे.
विशेषतः पावसाळ्यात, या बंद इमारतीत पाणी पाझरत असल्याने प्रकल्पाची पूर्णतः वाताहात झाली आहे. आतील लाकडी साहित्याला वाळवी लागली तर लोखंडी साहित्य पूर्णपणे गंजले आहे. इंटिरियरचे काम पूर्णपणे खराब झाले आहे. बाहेरून तर ही इमारत अगदी भकास दिसत आहे. सद्यस्थितीत तर संपूर्ण इमारतीवर तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने ही इमारत एक प्रकारे शहराच्या सौंदर्यावर गदा आणत आहे.
सध्या या प्रकल्पाचा परिसर मोकाट गुरांनी व्यापला असून, शहरात लावण्यात येणारे अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनरही येथेच ठेवले जात आहेत. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील या महत्त्वाच्या प्रकल्पाचा कोंडवाडा झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये याबद्दल तीव्र नाराजी असून, प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलून हा प्रकल्प पुन्हा सुरू करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे; अन्यथा सावंतवाडीच्या पर्यटन विकासाचे स्वप्न असेच धूळ खात पडेल.
चौकट
नूतनीकरणास मोठा खर्च
या प्रकल्पाचे नूतनीकरण करणे अत्यावश्यक आहे. पण, यासाठी येणारा मोठा खर्च पालिकेला परवडणारा नाही. दुसऱ्या बाजूला, जर कुणी भाडेतत्त्वावर हा प्रकल्प घेण्यास इच्छुक असेल, तर त्यालाच हा संपूर्ण डागडुजीचा खर्च उचलावा लागणार आहे, जे आर्थिकदृष्ट्या खूप कठीण आहे. पालिकेने यासाठी नवीन निविदा (टेंडर) प्रक्रिया राबवली होती. पण, वाढलेल्या नूतनीकरण खर्चामुळे कोणीही टेंडर भरण्यास पुढे आले नाही, असे समजते.
कोट
सावंतवाडी पर्यटन केंद्राच्या इमारतीची झालेली दुरावस्था लक्षात घेता फर्निचर, लोखंडी साहित्य तसेच अन्य विविध गोष्टींचा विचार करता ते नव्याने उभारण्यासाठी ३२ लाखाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याला तांत्रिक मंजुरी मिळताच आणि निधी उपलब्ध होताच हे काम पालिकेकडून करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत त्या ठिकाणी वाढलेली झाडे तसेच अन्य गोष्टींचा विचार करता त्याबाबत संबंधित यंत्रणेला योग्य त्या सूचना करू.
- तुषार सरडे, बांधकाम अभियंता, सावंतवाडी नगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.