राजभाषा समितीला
सन्मान पुरस्कार
रत्नागिरी ः हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करणाऱ्या संस्थांना केंद्र सरकारच्या राजभाषा विभागाकडून दिला जाणारा सर्वोच्च राजभाषा सन्मान पुरस्कार रत्नागिरी नगर राजभाषा कार्यान्वयन समितीला नुकताच प्रदान करण्यात आला आहे. गांधीनगर (गुजरात) येथील समितीचे अध्यक्ष व बँक ऑफ इंडियाचे विभागीय प्रमुख नरेंद्र देवरे, सदस्य सचिव रमेश गायकवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. समितीला व विभागीय कार्यालयाला असे दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मराठी भाषेला संपर्क भाषा हिंदीची जोड देऊन ग्राहक वाढवून व्यवसायवृद्धी करावी. सर्व योजनांची माहिती ग्राहकांना त्यांच्या भाषेत दिली जाईल, याकडे लक्ष द्यावे. हा पुरस्कार रत्नागिरी शहरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालय, विमा कंपनी व बँक यांनी केलेल्या हिंदी भाषेच्या कार्याचा गौरव असल्याचे समिती अध्यक्ष देवरे यांनी सांगितले. नगर राजभाषा समिती हर घर तिरंगा बाईक रॅली, स्वच्छता अभियान, नेत्रतपासणी शिबिर, वृक्षारोपणासारख्या राष्ट्रीय व सामाजिक अभियानात सहभागी असते. क्षेत्रीय मराठी भाषेबरोबरच हिंदीचा प्रयोग केला जातो, या कार्याची नोंद घेऊन हा पुरस्कार मिळाला. समितीचे सदस्य सचिव व बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक, राजभाषा रमेश गायकवाड काम पाहात आहेत.
‘आयटीआय’त तासिका
तत्त्वावर पदभरती
रत्नागिरी ः लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे कौशल्यावर आधारित तासिका तत्त्वावर पदभरती करण्यासाठी २० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. आरेखक यांत्रिकी व वीजतंत्री या व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठी २८ दिवसांच्या कालावधीकरिता घड्याळी तासिका तत्त्वावर ही पदभरती केली जात आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज व शैक्षणिक, अनुभव प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतीसह २० सप्टेंबरपर्यंत संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रभारी प्राचार्य शशिकांत कोतवडेकर यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांची लेखी व बौद्धिक, कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. पात्र मनुष्यबळाची निवड शासनाने विहित केलेल्या शैक्षणिक अर्हता, अनुभव व कौशल्य यानुसार करण्यात येईल.
प्रौढ दिव्यांगांना
मोफत प्रशिक्षण
रत्नागिरी : महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे व सांगली जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगांना मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण देते. २०२५-२६ या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरू आहे. गरजू दिव्यांगानी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरित संपर्क साधा, असे आवाहन मिरज येथली शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृहाच्या अधीक्षकांनी केले आहे.
डाक अदालत
२५ सप्टेंबरला
रत्नागिरी ः रत्नागिरी येथील अधीक्षक डाकघरतर्फे २५ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता अधीक्षक डाकघर यांच्या गोगटे-जोगळेकर कॉलेजशेजारील कार्यालयात विभागीय स्तरावरील डाक अदालत आयोजित केली आहे, असे डाकघर अधीक्षक यांनी कळवले आहे. पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालतीत दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, डाकवस्तू, पार्सल, बचतबँक व मनिऑर्डरबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रारअर्ज करावा, तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. डाकसेवेबाबतची आपली तक्रार अधीक्षक डाकघर विभागीय कार्यालयात २२ पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल, अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही, अशी सूचना डाक अधीक्षकांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.