swt1825.jpg
92435
सिंधुदुर्गनगरी : कुंभारमाठ येथील कातकरी कुटुंबांना जमीन मालकीची सनद वितरीत करताना पालकमंत्री नीतेश राणे. सोबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर व अन्य.
कातकरी कुटुंबांना सेवा पंधरवडा फलदायी
हक्काची घरे दृष्टिपथात : २५ लाभार्थ्यांसाठी भूखंड वाटप
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १८ : ‘सेवा पंधरवडा’ खऱ्या अर्थाने फलदायी ठरल्याचे स्पष्ट होत आहे. मालवण तालुक्यातील २५ आदिम म्हणजेच कातकरी कुटुंबांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक वर्षांच्या मागणीला जिल्ह्याच्या महसूल यंत्रणेने हिरवा कंदील देत या कुटुंबांना महाराष्ट्र शासनाच्या मालकीची जमीन वितरीत केली आहे. त्यामुळे लवकरच कुंभारमाठ (ता. मालवण) ग्रामपंचायत क्षेत्रात कातकरी समाजाची हक्काची चाळ उभी राहणार आहे.
खरे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाच्या मालकीची मोठ्या प्रमाणात जमीन आहे. ही जमीन गोरगरीब नागरिकांना उपयोगी यावी, असे जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय व्यक्ती, जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला वाटत असते. परंतु, त्यासाठी आवश्यक मेहनत कोणीही घेताना दिसत नव्हते. कुंभारमाठ ग्रामपंचायत क्षेत्रात महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असलेली जमीन त्या तालुक्यातील कातकरी समाजाला मोफत देण्याची मागणी गेली अनेक वर्षे सातत्याने होत होती. ज्या-ज्यावेळी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा आढावा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी घेत होते, त्या-त्यावेळी ही मागणी पुढे येत होती. परंतु, सबंधित यंत्रणा यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करताना दिसत नव्हती. परंतु, राष्ट्रनेता विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाने सुरू केलेल्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत कुंभारमाठ येथील अनेक वर्षे घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या कातकरी समाजाला हक्काची घरे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. केंद्र शासन ग्रामीण आवास योजनेंतर्गत मोफत घरे देण्यासाठी सज्ज असताना या कातकरी समाजातील कुटुंबांना हक्काची जमीन नसल्याने या लाभापासून वंचित राहावे लागत होते; परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आपल्या यंत्रणेसह यासाठी केलेला सातत्याने पाठपुरावा तसेच जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह त्यांच्या यंत्रणेने आपल्या अधिकाराचा वापर करून केलेले सहकार्य यामुळे २५ कातकरी कुटुंबांना शासकीय जमीन मोफत मिळाली आहे.
सेवा पंधरवडा उपक्रमाच्या प्रारंभप्रसंगी पालकमंत्री नीतेश राणे यांच्याहस्ते या २५ कातकरी कुटुंबांना मोफत भूखंड वितरीत केल्याची सनद देण्यात आली. प्रत्येक कुटुंबाला एक गुंठा अशाप्रकारे कुंभारमाठ ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व्हे नंबर २५ व २८ मधील २५ गुंठे जमीन त्यांच्या मालकीची करण्यात आली. आता या ठिकाणी चाळ टाईप घरे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतून उभारण्यात येणार आहेत. गेली अनेक वर्षे झोपडीत राहून जीवन जगणाऱ्या या कुटुंबांना हक्काच्या जमिनीत पक्क्या घरात तसेच मजबूत छताखाली राहता येणार आहे. हक्काची घरे मिळण्याची आशा निर्माण झाल्याने ही कातकरी कुटुंबे सध्या आनंदात आहेत. ग्रामीण विकास यंत्रणेने लवकरच आपली कार्यवाही पूर्ण करून त्यांना घरे उभी करून द्यावीत, अशी माफक मागणी त्यांची आहे.
चौकट
मालोंडमधील ‘त्या’ चारही कुटुंबांना मिळणार लाभ
मालोंड (ता. मालवण) येथील चार कातकरी कुटुंबांना हक्काची जमीन नाही. त्यांना प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना जमीन विकत घेण्यासाठी पीएम जनमन योजनेच्या माध्यमातून पंडित दीनदयाळअंतर्गत प्रत्येकी एक लाख रुपये अनुदान देण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे या आणखी चार कातकरी कुटुंबांना हक्काची घरे मिळण्याची शक्यता आहे.