swt1826.jpg
N92441
धाकोरेः येथील रस्त्यावरील अतिक्रमण तहसिलदार श्रीधर पाटील व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हटविण्यात आले.
धाकोरेतील अतिक्रमण प्रशासनाने हटविले
ग्रामस्थांच्या ३५ वर्षांच्या संघर्षाला अखेर पुर्णविराम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ः तालुक्यातील धाकोरे गावातील ग्रामस्थांनी तब्बल ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम दिला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे गावातील सरकारी अधिकृत रस्ता अतिक्रमणमुक्त झाला. हा ऐतिहासिक विजय धाकोरे आणि बांदिवडेवाडी येथील ग्रामस्थांच्या एकजुटीचा आणि त्यांच्या न्यायहक्काच्या लढ्याचा प्रतीक ठरला आहे.
गेल्या ३५ वर्षांपासून ‘होळीचे भाटले’ ते ‘बांदिवडेवाडी’ या दोन वाड्यांना जोडणारा महत्त्वाचा सार्वजनिक रस्ता काही व्यक्तींच्या अतिक्रमणामुळे बंद होता. त्यामुळे गावकऱ्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत होता. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न मार्गी लागत नव्हता. मात्र, ग्रामस्थांनी संघर्ष सोडला नाही. शेवटी त्यांनी हा प्रश्न पालकमंत्री राणे यांच्याकडे मांडला. त्यांनी तातडीने दखल घेत प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. काल (ता.१७) तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. प्रशासनाने जेसीबीच्या मदतीने अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा केला. यावेळी तहसीलदार, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या यशामागे सामाजिक कार्यकर्ते आत्माराम साटेलकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधले, सातत्याने पाठपुरावा केला आणि उपोषणाचे हत्यार देखील उपसले. अखेर १५ ऑगस्टला त्यांनी पालकमंत्री राणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व सविस्तर चर्चा केली. त्यानंतर प्रशासनाने ठोस पावले उचलली आणि ग्रामस्थांचा ३५ वर्षांचा संघर्ष अखेर यशस्वी झाला.