वृत्तपत्रविद्या पदविका
प्रवेशाला मुदतवाढ
सावंतवाडी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यास केंद्रात वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाची २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू असून, अंतिम मुदतवाढ ३० सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे. एक वर्ष मुदतीचा हा अभ्यासक्रम आहे. पत्रकारिता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तसेच माहिती व जनसंपर्क क्षेत्रासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. नोकरी वा शिक्षण पूर्ण करतानाच हा अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतो. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा बारावी अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण किंवा शालांत परीक्षा दहावी किंवा पूर्वीची अकरावी उत्तीर्ण अधिक दोन वर्षांचा कोणताही शासनमान्य अभ्यासक्रम उत्तीर्ण असणाऱ्या व्यक्ती या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. इच्छुकांना ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येईल. या अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी केंद्र संयोजक राजेश मोंडकर, मार्गदर्शक मंगल नाईक आणि प्रा. रुपेश पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केंद्रप्रमुख रमेश बोंद्रे यांनी केले आहे.
राठीवडे गावाला
राऊत यांची भेट
मालवण : रत्नागिरी, सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांनी नुकतीच राठीवडे गावाला सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांच्यासोबत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नाना नेरुरकर, बंडू चव्हाण, रामचंद्र राऊत, विजय पालव, नितीन पालव, राठीवडेच्या सरपंच दिव्या धुरी, उपसरपंच जाधव, स्वप्नील पुजारे, सुशांत धुरी, संतोष धुरी, भगवान धुरी, जयराम गावकर, सुभाष धुरी व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी राऊत यांनी राठीवडेचे ग्रामदैवत श्री देव गांगेश्वर मंदिरात जाऊन देवाचे दर्शन व आशीर्वाद घेतले. सरपंच धुरी, माजी उपसरपंच स्वप्नील पुजारे, सुभाष धुरी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर माजी उपसरपंच पुजारे आणि पुजारे घराण्याच्या गणरायाचे दर्शन घेतले. पुजारे परिवाराच्यावतीने श्री. राऊत यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ कार्यकर्ते व समाजसेवक सुभाष धुरी यांच्या निवासस्थानी भेट देऊन उपस्थित कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
स्तोत्र पाठांतर स्पर्धेस
मसुरे येथे प्रतिसाद
मालवण : श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्टच्यावतीने मसुरे कावावाडी येथील पेडणेकर बंधू निवास या ठिकाणी आर. पी. बागवे हायस्कूल आणि भरतगड इंग्रजी माध्यम शाळा विद्यार्थी गुणगौरव आणि श्री गणपती अथर्वशीर्ष, श्री राम स्तोत्र व श्री मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुष्पलता उत्तम पेडणेकर आणि मामा पेडणेकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात ३० स्पर्धकांनी सहभाग दर्शविला. विजेत्या १४ स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. वैष्णवी सावंत, प्रिशा खोत, नंदिनी आंबेरकर, कोमल मोंडकर, मिहीर मसूरकर, स्वानंदी हिंदळेकर, सांजवी जाधव, रणजित पेडणेकर, प्रांजल आंबेरकर, वेदिका पेडणेकर, प्रिया खोत, प्रतिभा भगत, सुधाकर भगत, प्रतिभा वेंगुर्लेकर यांना रोख पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण ज्योतिषाचार्य आडवलकर गुरुजी यांनी केले. बक्षीस वितरण परमानंद पेडणेकर, अध्यक्ष शरद पेडणेकर, काशिनाथ पेडणेकर, दिगंबर येसजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष बाबू पेडणेकर यांच्यासह कावावाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वच्छता मोहिमेसाठी
अधिकाऱ्यांची नियुक्ती
मालवण : राष्ट्रीय किनारा अभियान अंतर्गत समुद्र किनारा स्वच्छता मोहीम शनिवारी (ता. २०) नियोजितरीत्या यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी तालुकास्तरावरून ग्रामपंचायत येथे नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी समन्वय साधून शनिवारी सकाळी ८ वाजता उपस्थित राहून समुद्र स्वच्छता अभियान यशस्वी करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी चव्हाण यांनी केले आहे. यात वायंगणीसाठी राजेंद्र रणसिंग, तोंडवळी - सुधीर गायकवाड, रेवंडी - सूरज बांगर, मिर्याबांदा - विनायक जाधव, कोळंब - श्रीकृष्ण सावंत, वायरी भूतनाथ - सुनील चव्हाण, तर तारकर्लीसाठी उदय दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.