बोल बळीराजाचे-------लोगो
(१३ सप्टेंबर टुडे ३)
कोकणातच नव्हे तर सगळीकडेच शेतीतील माताभगिनींचा सहभाग खूप महत्वाचा आहे. यामागे शिक्षण, सामाजिक कारणं आणि थोड्या आर्थिक बाजूही कारणीभूत आहेत; पण वाढतं शिक्षणाचं सार्वत्रीकरण आणि मुलींची वाढती शैक्षणिक पातळी यामुळेच शेतातील तिचा सहभाग दिवसेंदिवस घटत चालला आहे. शिक्षणानं का कोणास ठाऊक; पण कामामुळे ठरणाऱ्या दर्जाबाबत अनावश्यक न्यूनगंड तयार झाले आहेत. हे सार्वत्रिक आहे. शेतीतील काम कमी दर्जाचं हा समज शेतीकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन अधोरेखित करतो; पण म्हणून अकुशल, कुशल शेतकऱ्याचे शेतीतील काम अडले नाही तर यांत्रिकिकरण, कंत्राटी पद्धत, व्यावसायिक दृष्टिकोन यातून मार्ग निघतोच आहे, निघत राहिलही..आता कृत्रिम बुद्धीवर चालणारी अनेक साधने उपलब्ध होत आहेत. शेतीतील कामाचे स्वरूप बदलत राहणार आहे. जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर सापडतेच. संक्रमणाच्या या काळात शेतीतील महिलांचा सहभाग नवी दिशा देणारा आहे.
- rat१९p२.jpg-
25N92583
- जयंत फडके,
जांभूळआड पूर्णगड रत्नागिरी
-----
कोकणात शेती बचतगटाच्या
फायद्यापासून दूर
शेतीपूरक व्यवसायात महिलाभगिनींचा सहभाग वाढत आहे. सेवाक्षेत्रात खूप मोठा हिस्सा आहे तसेच कोकणातील पर्यटन, घरगुती जेवण नाश्त्याच्या सोई, आंबा-काजू-कोकम-नारळ इ. पासून बनवले जाणारे पदार्थ, विक्रीस्टॉल इ. उद्योगातील महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. यातील यांत्रिकीकरण महिलास्नेही आहे. शैक्षणिक पातळीनुसार काम आहे. अनेक शासकीय योजना, अनुदानेही महिलाधार्जिणी आहेत. काही खंत वाटणाऱ्या गोष्टी सर्व सामान्य बळीराजाला न कळणाऱ्या आहेत. दहा-बारा वर्षांपासून महिला बचतगटांची मोठी चळवळ उभी राहिली. पहिल्यांदा दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठीच असलेली ही संकल्पना नंतर सर्व महिलांसाठी राबवण्यात येऊ लागली; पण याचा म्हणावा तसा फायदा कोकणात तरी शेतीक्षेत्राला होताना दिसत नाही. छोट्या छोट्या गावात वीस-पंचवीस बचतगट आहेत. त्यांनी गेल्या दहा-बारा वर्षांत पंधरा-वीस लाख रुपये बॅंकातून, महासंघ-उमेदकडून उचलले आहेत. एका गावात कोट्यांवधी रुपयांचा निधी वितरित झाला आहे; पण प्रत्यक्षात उद्योग-व्यवसाय जमिनीवरील काम म्हणाल तर दहा टक्केही दिसत नाही. हे पैसे घरगुती कारणांसाठी, चैनीच्या वस्तूंसाठी बचतगटांकडून व्याजी उचलले जात आहेत. सर्व सभा, वह्या, ऑडिट लिखाण अगदी नियमित आहे; पण यात महिलांना स्वाभिमानाने उभा करणारा कोणताच उद्योग दिसत नाही. अपवाद नाहीत असे नक्कीच नाही. जे यशस्वितेत दर्शवले जात आहेत ते वैयक्तिक पातळीवर होणारे यशवंत या बचतगटांच्या फॉर्म्युल्यात बसवले जात आहेत. ही सामूहिक संकल्पना नियमात बसवली की, व्यक्तिगत फायद्याची कशी करता येते याचे ते दाखले आहेत. बचतगटांच्या महिला शासकीय, राजकीय कार्यक्रमात हक्काचा श्रोतृवर्ग बनला आहे, याविरुद्ध बोलणे म्हणजे सामाजिक रोष ओढवून घेणे, हक्काची व्होटबॅंक गमावण्यासारखे आहे; पण खरेच यातून महिलांचे सक्षमीकरण होत आहे का? यातून किती महिला स्वतःच्या पायावर उभ्या राह्यल्या, आत्मनिर्भर झाल्या? किती कुटुंबे दारिद्र्यरेषेवर आली? सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नती तर खूपच लांबची गोष्ट..!
यात बचतगट चळवळीला कमी लेखण्याचा, चेष्टा करण्याचा बिलकूल उद्देश नाही. यातून खूप विधायक काम झाले आहेच; पण कोकणातील ग्रामीण भागात तरी ज्या बचतगटातील महिलाभगिनी शेतीक्षेत्राशीच निगडित नव्वद टक्क्यावर आहेत, त्या चळवळीचा माझ्या बळीराजाला फायदा होताना दिसत नाही हे वास्तव आहे. कोणत्याही शासकीय योजनेचे यशापयश त्या योजनेतील लाभार्थ्यांच्या जीवनमानात, राहणीमानात आणि तो करत असलेल्या नित्य नैमित्तिक कामात काय फरक पडला, यावर मोजायला हवे. त्यावर खर्च झालेले आकडे नुसते फुगून ना त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा ना प्रत्यक्ष शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत काही हाती लागत...फक्त दिवास्वप्नांचाच खेळ असेल तर करमणुकीच्या साधनांतून दिसतोच आहे. या योजनेच्या कर्त्याधर्त्यांनी कधीतरी एसी केबिनमधून बाहेर पडून जमिनीवरचे दाहक सत्य पडताळायला हवे.
मनरेगासारख्या महत्वाकांक्षी योजनेने माझ्या बळीराजाला खरंच फायदा झाला. महिला बचतगट योजनेच्या उद्दिष्टांवर काहीच शंका नाही; पण उणीव आहे ती उद्दिष्टपूर्तीची...शासकीय निधीचे ऑडिट होतच असते..मग सगळेच याकडे दुर्लक्ष का करताना दिसतात..? माझा बळीराजा या योजनेत शेती, शेतीपूरक उद्योग व्यवसायासाठी कधी सकारात्मक होणार..? की, असंच ‘तेरी भी चूप..मेरी भी चूप..!!’
(लेखक प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.