- rat१९p६.jpg-
२५N९२५९८
लांजा ः लांजा पोलिस ठाण्यात आयोजित बैठकीत पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे मार्गदर्शन करताना.
ध्वनिक्षेपकाबाबतच्या अटींचे पालन करा
नीळकंठ बगळे ः नवरात्रोत्सवासंदर्भात मंडळाशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १९ ः नवरात्रोत्सव सुरू होणार असून, उत्सवावेळी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता संबंधित मंडळांनी नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करावी. कार्यक्रम शांततेत पार पाडावेत, असे आवाहन पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी केले तसेच ध्वनिक्षेपकाबाबतच्या अटींचे योग्य पद्धतीने पालन करा, असेही त्यांनी सांगितले.
घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लांजा तालुक्यात दुर्गामातेची मूर्ती प्रतिष्ठापना करून नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना लांजा पोलिस ठाण्यात आयोजित बैठकीत पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी मार्गदर्शक सूचना केल्या. २२ सप्टेंबरपासून घटस्थापनेला सुरुवात होत आहे. या कालावधीत लांजा तालुक्यातील विविध ठिकाणी नवरात्रोत्सव मंडळांच्यावतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना करून त्याची यथासांग पूजा केली जाते. या निमित्ताने गरबा, फॅन्सी दांडिया, जाखडी नृत्य तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर लांजा पोलिस ठाण्याच्यावतीने पोलिस ठाण्यात नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, उपनिरीक्षक अमोद सरंगळे व उपनिरीक्षक देवकन्या मैंदाड व अन्य उपस्थित होते. या बैठकीत बगळे यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सव स्थापन करतेवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनिक्षेपकाबाबत अटीशर्तींबाबत मार्गदर्शकपर सूचना दिल्या. दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीकरिता आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाइन परवानगी घेण्याबाबत सूचित केले.