92811
जय गणेश स्कूल कबड्डीत विजेता
मालवण : तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तीन गटांमध्ये विजेतेपद पटकावले. त्यांच्या या यशामुळे तिन्ही संघ आता जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ वर्षांखालील मुले, १४ वर्षांखालील मुली आणि १७ वर्षांखालील मुली या तिन्ही संघांनी अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघांवर मात करत प्रथम क्रमांक मिळविला. या खेळाडूंच्या चमकदार कामगिरीचे कौतुक होत आहे. सर्व यशस्वी संघांना क्रीडा शिक्षक निशाकांत पराडकर, पंकज राणे, कबड्डी प्रशिक्षक नितीन हडकर आणि दीपक जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या देदीप्यमान यशाबद्दल मालवण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका वेंगुर्लेकर आदींनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
................
92812
आरोस हायस्कूल ‘खो-खो’त विजयी
आरोंदा ः क्रीडा व युवक सेवा संचनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने सावंतवाडी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा शुक्रवारी (ता. १९) नेमळे येथे आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटाखालील गटात आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल संघ विजेता ठरला. या संघाला शाळेचे क्रीडाशिक्षक अनिल नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघाचे संस्थाध्यक्ष रोहिदास सावंत, उपाध्यक्ष नीलेश परब, सचिव राजन नाईक, मुख्याध्यापक शिरीष नाईक आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.