कुंबळेतील शिबिरात
१८० जणांची तपासणी
मंडणगड ः प्राथमिक आरोग्यकेंद्र कुंबळे येथे १८ सप्टेंबर रोजी मंडणगड तालुक्यांतील स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाला सुरुवात झाली. मंडणगड आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्यकेंद्र कुंबळे येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे व सरपंच सानिका पाटील यांच्या हस्ते अभियानाची सुरुवात करण्यात आली. या वेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुमन व्यास व डॉ. आशिष जाधव, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शशिकांत पिळणकर, बालरोगतज्ज्ञ साक्षी जाधव, कुंबळे ग्रामस्थ व महिला, प्राथमिक आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिरात महिलांना उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, ॲनिमिया, मासिक पाळी स्वच्छता, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, पूरक आहार, गरोदर माता आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये १८० लोकांची तपासणी करण्यात आली तसेच १ ऑक्टोबरपर्यंत तालुक्यातील विविध आरोग्यकेंद्र आणि उपकेंद्रात हे अभियान राबवण्यात येणार आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.
राष्ट्रवादीतर्फे नवदुर्गांचा सन्मान
चिपळूण : नवरात्रीनिमित्त चिपळूण तालुका तसेच शहर महिला राष्ट्रवादी यांच्यावतीने २२ रोजी बांदल हायस्कूल सभागृहात सायंकाळी ४ ते ७ या वेळेत चिपळूण शहरातील अनेक क्षेत्रांमधील काही नामवंत महिलांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच चिपळूण शहरातील महिलांसाठी खास गरबा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गरब्यामध्ये बेस्ट परफॉर्मन्स, बेस्ट एक्स्प्रेशन, बेस्ट एनर्जेटिक परफार्मन्स, बेस्ट कॉस्च्युम अशी ही विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रूपाली चाखणकर, राष्ट्रवादी प्रदेश महिला उपाध्यक्षा तसेच माजी सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला पदाधिकारी यांच्या नियोजनात कार्यक्रम होणार आहे.
जलतरण स्पर्धेत
आरोहीला तीन सुवर्ण
चिपळूण ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या विद्यमाने शासकीय जलतरण तलाव रत्नागिरी येथे झालेल्या शालेय जलतरण स्पर्धेत सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डेतील विद्यार्थिनी आरोही पालखडे हिने चांगली कामगिरी केली. १७ वर्षे वयोगटात खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत आरोहीने एकाचवेळी तीन सुवर्णपदके पटकावली. २०० मीटर फ्री स्टाइल, ४०० मीटर फ्री स्टाइल, ४०० मीटर मिडले या प्रकारात तिने ही पदके मिळवली. रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील जलतरणपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
अनारीत आजपासून
नवरात्रोत्सव
चिपळूण : अनारी येथील जय हनुमान नवतरुण नवरात्रोत्सव मंडळ आणि हनुमान समाजसेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून (ता. २१) होणाऱ्या नवरात्रोत्सवाची तयारी करण्यात येत आहे. सलग १८व्या वर्षी अनारी गावातील हनुमान मंदिरामध्ये हा उत्सव साजरा होत आहे. रविवारी सती ते अनारी या मार्गावरून भव्य मिरवणुकीने अनारी येथे देवीचे आगमन होणार आहे. सोमवारी देवीची प्राणप्रतिष्ठापना व घटस्थापना होईल. ३० सप्टेंबर रोजी अष्टमी होमहवन, २ ऑक्टोबरला श्री सत्यनारायणाची महापूजा आणि ३ ऑक्टोबरला मिरवणुकीने देवीचे विधिवत विसर्जन केले जाणार आहे. उत्सवाच्या या कालावधीत दररोज रात्री महाआरती, हरिपाठ, ग्रंथवाचन आणि दांडिया रास तसेच इतर करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत.