‘खेर्डी’चे १६ खेळाडू जिल्हा स्पर्धेसाठी पात्र
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः रत्नागिरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी चिंचघरी (सती) विद्यालयाने कुस्ती, ज्युदो व कबड्डी या तिन्ही खेळांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत तालुका तसेच जिल्ह्यात विद्यालयाचा गौरव वाढवला.
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षांखालील ४० किलो गटात अनुष्का शिगवण याने द्वितीय क्रमांक पटकावला. १७ वर्षांखालील मुलींमध्ये ४६ किलो गटात शमिका शिंदेने हिने प्रथम तर मुलांमध्ये मयूर घोरपडे ८९ किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकावला. १९ वर्षांखालील मुलींमध्ये ५३ किलो गटात अनुष्का कदमने प्रथम, ऋतुजा सुतारने ५५ किलो वजनगटात द्वितीय, समिरा देवरेने ५० किलो वजनगटात द्वितीय क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांपैकी घोरपडे, कदम व शिंदे यांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. गुहागर येथील जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत १९ वर्षांखालील मुली गटात समिरा देवरे व ऋतुजा सुतार यांनी प्रथम, १४ वर्षांखालील मुली गटात अनुष्का बुरटे हिने तृतीय क्रमांक मिळवला. ऋतुजा सुतार व समिरा देवरे यांची कोल्हापूर विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली. मुलांमध्ये ज्युदो स्पर्धेत अर्चित बामणे व सायश हातणकर यांनी आपापल्या गटात प्रथम तर सार्थक कडवने ६० किलो वजनगटात द्वितीय क्रमांक मिळवला.
चौकट
कबड्डी स्पर्धेत विजेतेपद
सांघिक स्पर्धेत कबड्डीमध्ये विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने व १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवले. हे संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. जिल्हास्तरीय १४ वर्षांखालील मुली कबड्डी स्पर्धेत सती संघाने तृतीय क्रमांक पटकावला.