महिला, युवतींसाठी नवदुर्गा दर्शन दौरा
चिपळूण : शहरातील युवती, महिलांसाठी नवरात्रोत्सवानिमित्त खास मोफत नवदुर्गा दर्शनदौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवात नऊ दिवस चालणारा हा उपक्रम उमेश सकपाळ यांच्या पुढाकारातून राबवण्यात येत असून, यामध्ये शहर व परिसरातील महिला-भगिनींना नऊ प्रमुख देवस्थानांचे दर्शन घडवण्यात येणार आहे. या यात्रेद्वारे श्री सुकाईदेवी (पाग), शारदादेवी (तुरंबव), भवानीआई (टेरव), महाकाली (कुंभार्ली), आई सुकाई (खडपोली), रामवरदायिनी मंदिर (दादर), झोलाई मंदिर (वालोपे), करंजेश्वरी (गोवळकोट) आणि महालक्ष्मीदेवी (मिरजोळी) अशा देवस्थानांचे दर्शन होणार आहे. यात महालक्ष्मी, करजेश्वरी, रामवरदायिनी व शारदादेवी या कोकणातील महत्त्वाच्या नवदुर्गा स्थळांना विशेष दर्शन घडवले जाणार आहे. चिपळूण शहराच्या प्रत्येक विभागातून गाड्या सोडल्या जाणार आहेत. दररोज किमान २० गाड्या धावतील, असे उमेश सकपाळ यांनी सांगितले.
चिपळूण शहरात स्वच्छता मोहीम
चिपळूण ः चिपळूण शहर मंडळतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व सेवा पंधरवड्याच्या औचित्याने शहरात नुकतीच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सकाळी ८ ते १०.३० या वेळेत मध्यवर्ती व जुन्या बसस्थानकात भाजप कार्यकर्त्यांनी झाडू हातात घेऊन स्वच्छतेचा संकल्प केला. या मोहिमेदरम्यान, बसस्थानक परिसरातील गवत काढून प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमात प्रवाशांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि एक वेगळीच एकात्मतेची भावना निर्माण झाली. स्वच्छ भारताचा संदेश हा फक्त कागदावर नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून द्यावा, हेच आमचे उद्दिष्ट आहे, असे शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांनी सांगितले. स्वच्छतेच्या या उपक्रमातून मोदींच्या सेवाभावाचा संदेश जणू थेट चिपळूणच्या नागरिकांपर्यंत पोहोचला. एक दिवसाची सफाई मोहीम असूनही, नागरिकांच्या मनात मात्र स्वच्छता हीच खरी सेवा, हा विचार पक्का झाला. या मोहिमेत भाजप नेते प्रशांत यादव, रामदास राणे, विजय चितळे, आशीष खातू, नरेंद्र बेलवलकर, सारिका भावे, विनायक वरवडेकर, शीतल रानडे, रत्नदीप देवळेकर, रसिका देवळेकर, संदीप भिसे, वैशाली निमकर, अश्विनी वरवडेकर आदी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून योगदान दिले.
92846
कुस्ती स्पर्धेत यश शिंदेचे यश
चिपळूण ः क्रीडा व युवक सेवा संचनालय, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत तालुक्यातील पेढे येथील आर. सी. काळे कॉलेजमधील यश शिंदे यांनी १९ वर्षांखालील स्पर्धेत ८६ किलो वजनीगटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. शिंदे याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याने त्याची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या गटात तो रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. त्याला महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक अमरजित मस्के यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अभयदादा सहस्रबुद्धे, चिटणीस सुनील गमरे, प्राचार्य विनायक माळी, पर्यवेक्षिका विशाखा माळी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थांनी यशचे अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
---